नागपंचमीसाठी शिराळा सज्ज

By admin | Published: August 5, 2016 11:33 PM2016-08-05T23:33:46+5:302016-08-06T00:19:53+5:30

यंदा झगमगाटाला फाटा : प्रशासनाची जय्यत तयारी; चोख पोलिस बंदोबस्त

Shirala ready for Nagpanchami | नागपंचमीसाठी शिराळा सज्ज

नागपंचमीसाठी शिराळा सज्ज

Next

विकास शहा - शिराळा --येथे रविवार, दि. ७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिध्द नागपंचमीसाठी शिराळा नगरी आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. स्वागत कमानी आणि स्वागत फलक न लावण्याच्या गावकऱ्यांच्या निर्णयामुळे यावेळी गावामध्ये स्वागत फलक, कमानी यांचा झगमगाट दिसत नाही. यानिमित्ताने शुक्रवारी पोलिसांमार्फत मरीआई चौकात संचलन करण्यात आले.
जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळेल, या आशेने २००२ पासून शिराळकरांनी अनेक बंधने घालून घेतली आहेत. प्रशासन, वन विभाग आदी शासकीय यंत्रणेला सहकार्य करत आजपर्यंत नागपंचमी साजरी केली. २००२ पासून २०१४ पर्यंत उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश होता. त्यामुळे अंबामाता मंदिरात आणि घरोघरी जिवंत नागाची पूजा करण्यास मिळाली. मात्र गतवर्षी अंतिम आदेशामुळे नाग पकडण्यास बंदी घातल्याने जिवंत नागपूजा झाली नाही. गतवर्षी तत्कालीन वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नागरिकांना, खास कायदा करून नागपंचमीस गतवैभव प्राप्त करून देईन, असे आश्वासन दिले होते. मात्र तू पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी यावर्षी नागपंचमीबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रकिया व निवडणुकांवर बहिष्कार टाकून, नागपंचमीला घरांवर काळे झेंडे लावण्याचा निर्णय घेतला
आहे.
नागपंचमीसाठी एक पोलिस उपधीक्षक, १२ पोलिस निरीक्षक, २२ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस फौजदार, २६१ पोलिस, २५ महिला पोलिस, ५० वाहतूक शाखा पोलिस, १० व्हिडिओ कॅमेरे, ५ ध्वनिमापन यंत्रे, अशा ३८५ अधिकारी, कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. वन विभागामार्फत मुख्य वन संरक्षक एन. के. राव, विभागीय वनक्षेत्रपाल समाधान चव्हाण, समन्वय अधिकारी एस. डी. गवते, वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ३ विभागीय वन अधिकारी, १० सहाय्यक वनसंरक्षक, १० वनसेमपाल, २० वनपाल, ५० वनसंरक्षक, ७० वनमजूर असे १६३ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ७ गस्तीपथकेही तैनात करण्यात आली आहेत.
तहसीलदार शीतलकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी तहसील कार्यालयात नगरपंचायत येथे खास कक्ष उघडण्यात आला आहे, तसेच १० पथके नेमण्यात आली आहेत. शिराळा नगरपंचायतीची पहिली नागपंचमी असल्याने त्याचे नियोजन प्रशासक म्हणून तहसीलदार करत आहेत.
व्यापाऱ्यांसाठी जागा वाटप, २४ तास पिण्याचे पाणी, गावातील स्वच्छता, औषध फवारणी आदी व्यवस्था नगरपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्पदंशासाठी खास कक्ष, तसेच गावामध्ये सात ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहेत. ११०० सर्पदंश प्रतिबंधक लसी या रुग्णालयात उपलब्ध आहेत. सांगली येथील एक पथक येथे येणार
आहे. एसटीमार्फत ८३ बसेस तसेच सांगली, कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर, कोल्हापूर आदी आगाराच्या गाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विश्वासराव नाईक महाविद्यालय, मांगले, कोकरूड नाका, कापडी नाका, पाडळी नाका याठिकाणी त्या-त्या मार्गावरील बसथांबे उभारण्यात आले आहेत.
अंबामाता मंदिर परिसरात व्यापाऱ्यांचे विविध खाद्यपदार्थ, खेळणी आदी साहित्याचे स्टॉल उभे राहू लागले आहेत. मनोरंजनासाठी मिनी एस्सेल वर्ल्डची उभारणी अंतिम टप्पात आहे. अंबामाता मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी अंबामाता ट्रस्टमार्फत खास व्यवस्था करण्यात येत आहे.

स्वागत कमानींऐवजी : काळे झेंडे
शिराळकरही नागपंचमी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महिलावर्ग स्वच्छता, येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध खाद्यपदार्थ करण्यात गुंग आहेत. यावर्षी स्वागत कमानी, स्वागत पताकाऐवजी काळे झेंडे लावण्यात येणार आहेत. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वन विभागामार्फत प्रबोधनपर रॅलीही काढण्यात येणार आहे.

Web Title: Shirala ready for Nagpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.