शिराळ्यातील व्यापाऱ्यांचा उद्याच्या बंदला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:10+5:302021-02-25T04:34:10+5:30
शिराळा : वस्तू आणि सेवा कर कायद्यातील (जीएसटी) जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सै (कैट) कडून शुक्रवार ...
शिराळा : वस्तू आणि सेवा कर कायद्यातील (जीएसटी) जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सै (कैट) कडून शुक्रवार दि. २६ रोजी देशव्यापी व्यापार बंदचे आवाहन केले आहे. त्यास शिराळा तालुका व्यापारी संघटना व शिराळा व्यापारी महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यावसायिकांचे काम सोपे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जीएसटी कायद्यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये शंभरवेळा सुधारणा झाल्यामुळे ही करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची ठरत आहे. अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या कायद्यानुसार थोडीशीसुद्धा चूक झाली, तर भरमसाट दंडाची तरतूद केली जाते. याच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आवाहनानुसार शिराळा तालुक्यातील व शहरातील संपूर्ण व्यापार बंद राहील.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, ‘कैट’चे प्रदेश सचिव अविनाश चितुरकर, चंद्रकांत जाधव, विश्वास कदम, सचिन शेटे, उद्धव खुर्द, दस्तगीर अत्तार, निसार मुल्ला, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.