शिराळ्यात पाहुण्यांचे स्वागत बोडक्या रस्त्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:53+5:302021-04-16T04:27:53+5:30
शिराळा : शिराळा-इस्लामपूर आणि शिराळा ते कोकरूडपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल केली आहे. या रस्त्यांचे काम ...
शिराळा : शिराळा-इस्लामपूर आणि शिराळा ते कोकरूडपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल केली आहे. या रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ठेकेदारांनी अद्याप एकाही झाडाचे वृक्षारोपण केले नाही. एकीकडे शासन वृक्षवल्ली आम्हा सोयरीचे फलक लावून कोट्यवधी रुपये खर्च करून झाडे लावण्याचा संकल्प करत आहे. दुसरीकडे रस्ता विकासच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी पुन्हा वृक्ष लागवडही प्रशासनाकडून होत नाही.
शिराळा हे पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील सुंदर, विलोभनीय असे गाव आहे. गावापासून आपण जस-जसे पूर्वेकडे म्हणजेच इस्लामपूरकडे जातो तशी हिरवळ कमी होत जाते. या सुंदर रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली चिंचेची, लिंबाची झाडे वाटसरूंना गारवा आणि पशु/पक्ष्यांना आसरा देत होती. या रस्त्याच्या बाजूची चिंचेची आणि लिंबाची झाडे सोडली तर बाकीचा सर्व मोकळा माळ आहे. थोडं-थोडं जंगल अजून शिल्लक आहे.
रस्ता रुंदीकरणाचे सरकारमध्ये जे पेव फुटले आहे, त्यावरून असे दिसते की महाराष्ट्रात फक्त रस्ते विकासच सर्व काही आहे. शिराळा ते इस्लामपूर आणि शिराळा ते कोकरूडपर्यंतच्या सर्व झाडांवर लाल रंगाच्या खुणा केल्या होत्या. काही दिवसांत या झाडांची कत्तल केली आहे. सर्व रस्ता रुंदीकरणामध्ये शिराळा जवळची हजारो झाडे तोडली आहेत. त्यामुळे आपल्या शिराळ्यात येण्याचा मार्ग उघडा बोडका दिसत आहे. हे सर्व आपण नुसतच बघत बसलो आहोत. वृक्षांचे पुर्नरोपण करण्याचे प्रयोग या रस्त्यांसाठी करण्याची गरज आहे. वृक्षांचे पुर्नरोपण प्रयोग अन्य शहरात यशस्वी झाला आहे.
चौकट
वृक्ष लागवडीकडे ठेकेदारांचे दुर्लक्ष
वृक्षतोड झाल्यानंतर ठेकेदाराने तोडलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे. मात्र, या रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच पुढे पावसाळा सुरू होणार आहे तरीही अद्याप एकही झाड ठेकेदाराने लावले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. याकडे अधिकाऱ्यांचेही फारसे लक्ष दिसत नाही.