जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सजली; आकर्षक स्वागत कमानी, मिरवणुकीचे ट्रॅक्टर सजले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:10 PM2023-08-21T12:10:06+5:302023-08-21T12:11:13+5:30

पोलिस-वनविभागाचे संचलन

Shiralanagari decked up for Nag Panchami; Attractive welcome arches, decorated procession tractors | जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सजली; आकर्षक स्वागत कमानी, मिरवणुकीचे ट्रॅक्टर सजले

जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सजली; आकर्षक स्वागत कमानी, मिरवणुकीचे ट्रॅक्टर सजले

googlenewsNext

विकास शहा

शिराळा : येथील जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सज्ज झाली आहे. अंबामाता मंदिर परिसरात विक्रेत्यांचे स्टॉल, मनोरंजनाचे मिनी एस्सेल वर्ल्ड आकर्षण आहे. सोमवारी, दि. २१ रोजी नागपंचमीनिमित्त भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. पोलिस व वनविभागाने शहरात संचलन केले. नागमंडळांचे कार्यकर्ते मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर सजावटीत व्यस्त आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक आणि स्वागत कमानी उभारल्या आहेत.

राज्य मार्ग ४ पेठ नाका येथून रेठरे धरण एकेरी मार्गाने वाहने शिराळ्यात येतील. तर जाण्यासाठी कापरी, कार्वे, ऐतवडे बुद्रूक, लाडेगाव, वशीहून येडेनिपाणी तसेच गोळेवाडी, सुरुल, ओझर्डे, करमाळे, एमआयडीसी मार्ग आहे.

शिराळा बाह्यवळण ते पेठ नाका रस्ता फक्त येण्यासाठी असेल. कोकरूड, सांगाव, मांगले, वाकुर्डे येथून दूध वाहतुकीची वाहने बिऊर बाह्यवळण रस्त्याने जातील. वाहनतळ आयटीआय, खेड रस्ता, पाडळी नाका, मांगले रस्ता, नाथ मंदिर, बाह्यवळण रस्ता, नाचिकेता शाळा आदी ठिकाणी आहे.

यावेळी आरोग्य विभागाकडून शहरात बस स्थानक, व्यापारी सभागृह, पाडळी नाका, लक्ष्मी चौक, शनी मंदिर, समाज मंदिर, नायकुडपुरा या सात ठिकाणी आरोग्य पथके तैनात आहेत. ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश कक्ष स्थापन केला आहे. सर्पदंश प्रतिबंधक ११०४ लसी उपलब्ध आहेत.

नगरपंचायतमार्फत औषध व पावडर फवारणी, पाण्याची व्यवस्था, स्टॉल आदींचे नियोजन केले आहे. वनविभागाने १ उपवनसंरक्षक, २ विभागीय वनाधिकारी, ४ सहाय्यक वनसंरक्षक १० वनक्षेत्रपाल, २३ वनपाल , ४५ वनरक्षक, ८० वनमजूर, १० पोलिस कर्मचारी असा १७५ अधिकारी व कर्मचारी तसेच १० गस्तीपथकांचा बंदोबस्त ठेवला आहे.

एसटी महामंडळाने ७३ बसचे नियोजन केले आहे. इतर आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. मुख्य बस स्थानक, विश्वासराव नाईक महाविद्यालय, पाडळी नाका, मांगले रस्ता, साई मंगल कार्यालय येथे थांबे आहेत.

असा असेल बंदोबस्त-

मिरवणूक मार्ग व अंबामाता मंदिर दर्शनाचा आराखडा केला आहे. १० ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही, २० व्हिडीओ कॅमेरे, ४ वॉच टॉवर उभारले आहेत. उपाधीक्षक, १४ पोलिस निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, ५१२ कर्मचारी, ४० महिला पोलिस, ५० वाहतूक पोलिस, २० कॅमेरामन, ११ ध्वनी मापन यंत्रे असा पोलिस बंदोबस्त आहे. तसेच वनविभागाचाही स्वतंत्र बंदोबस्त आहे.

Web Title: Shiralanagari decked up for Nag Panchami; Attractive welcome arches, decorated procession tractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.