संघर्षातून शिराळ्याचे अभिनय कुंभार बनले आयएएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:35+5:302021-03-20T04:24:35+5:30

बाबासाहेब परीट बिळाशी : स्पर्धा परीक्षा करणे म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिस्थितीच्या भट्टीतून स्वतःला तावून-सुलाखून काढायचे आणि आपणच हातोडा ...

Shirala's acting potter became IAS through struggle | संघर्षातून शिराळ्याचे अभिनय कुंभार बनले आयएएस

संघर्षातून शिराळ्याचे अभिनय कुंभार बनले आयएएस

Next

बाबासाहेब परीट

बिळाशी : स्पर्धा परीक्षा करणे म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिस्थितीच्या भट्टीतून स्वतःला तावून-सुलाखून काढायचे आणि आपणच हातोडा ठोकून आपल्याला सिद्ध करायचं... अभिनय कुंभार यांनी स्वत:ला सिध्द केलंय. ग्रामीण पार्श्वभूमी होती पण आर्थिक संघर्ष नव्हता, संघर्ष होता तो फक्त करिअर सिद्ध करण्याचा... वडिलांचे वडील सावळा कुंभार हे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सभेआधी डफावर थाप मारायचे आणि रान पेटवायचे, वडील प्राचार्य पण नाट्यवेडे.. आईचे वडील उपजिल्हाधिकारी दत्तात्रय खेबुडकर यांचे सख्खे भाऊ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याकडून कलेचा वारसा त्यांना रक्तातच मिळाला होता. साहित्य कला वक्तृत्व आणि नाट्य याची आवड असणाऱ्या अभिनय कुंभार यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा खरा रोल उभा केला. शिराळाच्या जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे प्राथमिक शिक्षण, शिवछत्रपती हायस्कूल शिराळा येथे माध्यमिक शिक्षण, अकरावी-बारावी न्यू कॉलेज कोल्हापूर तर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून धातू शास्त्र अभियांत्रिकी पदवी घेऊन खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या अभिनय यांना सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायची ओढ होती. त्यांचे रूम पार्टनर आनंद पाटील व विश्वास नांगरे-पाटील हे त्या आधीच आयएएस-आयपीएस झाले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगातून १९९९ ला यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात ३६५ रँक आली. स्वप्न आयएएसचे होते. मित्र आनंद पाटील व विश्वास नांगरे-पाटील यांनी जिगर पेरली. खासगी कंपनीतले चाकोरीबद्ध जीवन नको होते. म्हणून तीन वर्षानंतर राजीनामा दिला आणि नवे आव्हान स्वीकारले. सलग अभ्यास केला कारण अभ्यासाला पर्याय नसतो. त्यातूनच २००१ ला ८१ व्या रँकने ते आयएएस झाले. अभियांत्रिकी शिक्षण घेताना नावात अभिनय असला तरी अंगातला अभिनय दाखवण्यासाठी पुरुषोत्तम करंडक पर्यंत त्यांनी धडक मारली. बापूसाहेब ओक पारितोषिक नाटककार विजय तेंडुलकर यांच्या हस्ते घेऊन दाद मिळवली. अभ्यास करताना संघर्ष जेवढा महत्त्वाचा होता. त्याहून अधिक संघर्ष आयएएस झाल्यानंतर त्यांना करावा लागला. तो त्यांनी केलाही. सध्या ते अप्पर आयुक्त आयकर विभाग मुंबई येथे कार्यरत आहेत. आजही अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर असताना नाट्य संगीत ऐकणं, चांगलं नाटक बघणं, वाचन करणं हे सतत चालूच आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यामुळे करिअरला अडथळा होतो. हा रिवाज मोडून काढण्यासाठी शिराळ्यानेच खरी ताकद दिली असे ते आवर्जून सांगतात.

यापूर्वी त्यांनी असिस्टंट कमिशनर पदावर कोल्हापूर, पुणे, नांदेड व मुंबई येथे काम केले. सध्या ते अप्पर आयुक्त (आयकर) मुंबई येथे कार्यरत आहेत.

Web Title: Shirala's acting potter became IAS through struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.