शिराळ्यात आरोग्य विभागच सलाईनवर
By admin | Published: November 9, 2014 10:53 PM2014-11-09T22:53:52+5:302014-11-09T23:41:31+5:30
दोनच अधिकारी : ग्रामीण रुग्णालयात यंत्रणाच नाही
विकास शहा-शिराळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर आहे. कोकरुड ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना आहे, तर शिराळा या तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात दोनच डॉक्टर! यामुळे आरोग्य व्यवस्था म्हणजे ‘असून खोळंबा नसून घोटाळा’, अशी परिस्थिती आहे. एवढी बिकट परिस्थिती असूनही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी डॉक्टरांची भरती करीत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
डोंगरी विभाग म्हणून हा तालुका ओळखला जातो. त्यामुळे डोंगर-कपारीत राहणाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळणे अवघड झाले आहे. नुसत्या रुग्णालयाच्या इमारती आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती आहे. त्यामुळे फक्त प्रशासकीय खर्चच होत आहे. मात्र आरोग्य सुविधेचे वाभाडे निघत आहेत. जर वैद्यकीय अधिकारीच नसेल, तर त्या सुविधेचा काय उपयोग? असा सवालही रुग्णांना पडत आहे.
कोकरुड हे विधानपरिषद सभापती यांचे गाव. याठिकाणी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र अशी दोन रुग्णालये. यामधील ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी, अशा चार डॉक्टरांच्या नेमणुका आहेत. मात्र यापैकी एकही जागा भरलेली नाही. त्याचबरोबर येथे १५ इतर कर्मचारी आहेत. या ठिकाणी डॉक्टर नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर मात्र लाखो रुपये पगाराच्या नावाखाली खर्च होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर पाहिजेत. मात्र याठिकाणी एकच डॉक्टर आहे. ही एकच व्यक्ती ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन्ही ठिकाणी तपासणी करीत असते. त्यामुळे त्यांचीही धावपळ होते.
ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी अशी चार पदे आहेत. यातील अधीक्षक पद २००४ पासून रिक्त आहे. सध्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व एक वैद्यकीय अधिकारी असे दोनच डॉक्टर आहेत. त्यामुळे हे दोन डॉक्टर कोण-कोणती कामे करणार? हा प्रश्न आहे. येथील एक्स-रे मशीन बंद आहे, कारण टेक्निशियनच नाही.
तालुक्यात सात प्राथमिक केंदे्र आहेत. त्यापैकी चरण, सागाव, कोकरुड, शिरशी येथे एकेकच डॉक्टर आहे. फक्त अंत्री, मणदूर, मांगले या ठिकाणी दोन-दोन डॉक्टर आहेत. ही अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राची! याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर आता कोकरुडला नवीन इमारत मंजूर झाली आहे, तर शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. जर अशी सुविधा आरोग्य विभागाकडून मिळत असेल, तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल केला जात आहे. येथील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.