शिक्षणाचा भोंगा!, सांगलीतील 'या' गावाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरु केला विशेष उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 04:27 PM2023-09-15T16:27:52+5:302023-09-15T16:30:15+5:30
सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यात माॅडेल स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या ...
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यात माॅडेल स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या गावातील प्रगत शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राहावे आणि भविष्यात गावातील शैक्षणिक संपत्ती अधिक समृद्धी व्हावी, यासाठी १२ सप्टेंबरपासून शिराळे खुर्द, ता. शिराळा गावात ‘शिक्षणाचा भोंगा’ (डिजिटल डिटाॅक्स) उपक्रम ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
शिराळे खुर्द येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत जि. प. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सावंत यांनी ‘शिक्षणाचा भोंगा’ (डिजिटल डिटॉक्स) बाबत ठराव मांडला आणि याबाबत सविस्तर माहिती दिली. पालक आणि ग्रामस्थ यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गावात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत टीव्ही व मोबाइलचा वापर बंद करून विद्यार्थी अभ्यासाला बसतील, असे नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचेमार्फत प्रबोधन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी हा उपक्रम पूरक ठरणार आहे. सध्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणात टीव्ही व मोबाइलचा वापर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होत आहे. म्हणूनच गावाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवयी लागावी यासाठी ‘अभ्यासाचा भोंगा प्रकल्प’ गावात राबविला जात असून याचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावे घेतील, असा विश्वासही सरपंच शर्मिला आंदळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रय आंदळकर, जे. के. पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश पाटील, पल्लवी पाटील, मुख्याध्यापक प्रकाश सावंत, शिक्षक सतीश मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, अरुण पाटील, महादेव गुरव, गणपती गुरव, श्रीरंग पाटील, संदीप कांबळे, अनिकेत मोरे आदी उपस्थित होते.
मुलांना अभ्यासाची गोडी लागली पाहिजे, या उद्देशाने शिक्षणाचा भोंगा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास तरुणासह पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, हाच हेतू आहे. -शर्मिला आंदळकर, सरपंच, शिराळे खुर्द, ता. शिराळा.