‘शिराळ्याची नागपंचमी’ थेट आयपीएलमध्ये भगतसिंग नाईक यांनी ‘वानखेडे’वर झळकावला फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:42 PM2023-04-09T18:42:52+5:302023-04-09T18:43:29+5:30
शिराळा आणि नागपंचमीचे नाते अतूट आहे.
विकास शहा
शिराळा : शिराळा आणि नागपंचमीचे नाते अतूट आहे. त्यामुळेच पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक नागपंचमी पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी शनिवारी त्यांनी चक्क मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई-चेन्नई क्रिकेट समान्यवेळी ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’ असे बॅनर फडकावत या प्रश्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.
मुंबई येथे शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग असा आयपीएल क्रिकेट सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी ॲड. भगतसिंग नाईक वानखेडे मैदानावर गेले होते. सामन्यादरम्यान त्यांनी ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’, असे लिहिलेला बॅनर झळकवला. त्यांच्यासोबत तुषार मुळीक, अभिषेक यादव हेही होते. ॲड. नाईक शिराळ्याच्या नागपंचमीबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी शिराळ्याच्या नागपंचमीच्या इतिहासाबाबत एक पुस्तकही लिहिले आहे.
या पुस्तकाच्या प्रती तसेच निवेदने लोकप्रतिनिधींना दिली आहेत. शनिवारी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर नागपंचमीचा फलक झळकावल्याचे शिराळकरांनी जाेरदार स्वागत केले. समाजमाध्यमांवरही दिवसभर या फलकाचे छायाचित्र फिरत हाेते.