शिराळकरांची जपले देशी भाताचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:35+5:302021-03-28T04:24:35+5:30
बदलते हवामान व रोगराईच्या वातावरणात पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. देशी वाण या वातावरणात समरस होत असल्याने ...
बदलते हवामान व रोगराईच्या वातावरणात पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. देशी वाण या वातावरणात समरस होत असल्याने त्यांच्या उत्पादनाची निश्चित खात्री शेतकऱ्यांना असते. तसेच त्याच्या उत्पादनाचे काैशल्यही आत्मसात असल्याने अनेक शेतकरी आजही हा वाण जतन करण्यासाठी उत्सुक आहेत. गुणवत्ता, चव आणि देशी वाण जपल्याचे समाधान या त्रिसूत्रीवर शेतकरी दरवर्षी मेहनतीच्या जोरावर या वाणांचे उत्पादन घेत आहेत.
जोंदळा हे वाण अगदी जोंदळ्या प्रमाणे गोल व चवीला बासमती तांदळाच्या समान आहे. तर शिराळा तांदळचा विशेष करून चिरमुरे उत्पादनासाठी चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. तालुक्यात अति पाऊस होत असल्याने भात शेती हे येथील मुख्य पीक आहे. याच जोरावर हा वाण टिकला असून त्यांची स्थानिक पातळीवर ग्राहक आजही मागणी करताना दिसून येतात. साधारण ७० ते १०० रुपये किलोच्या घरात हे वाण विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनाही यातून समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.
विशिष्ट चव आणि वास यामुळे भविष्यातही उत्पादक शेतकरी वर्गही या देशी वाणांशी जोडला राहील. नवनवीन वाण आणि अधिक उत्पादनाची आपेक्षा यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग जुन्या देशी वाणांकडे दुर्लक्ष करत आहे. अशा स्थितही देशी वाणांच्या उत्पादनामध्ये काही शेतकरी रस दाखवत असल्याने त्याचे महत्त्व आजही अधोरेखित होत आहे.