शिराळ्याच्या दोन भाऊंना आता सदाभाऊंचे आव्हान-जयंतरावांपुढेही ठोकला शड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:02 AM2018-03-08T01:02:24+5:302018-03-08T01:02:24+5:30
इस्लामपूर : राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातून आ. नाईक यांचे विरोधक मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोन भाऊंच्या पाठीशी
अशोक पाटील ।
इस्लामपूर : राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातून आ. नाईक यांचे विरोधक मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोन भाऊंच्या पाठीशी जयंतरावांनी ताकद लावली आहे. आता आ. नाईक यांच्या साथीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले आहेत. या दोघांनी विकासकामांच्या उद्घाटनाचे औचित्य साधत जयंतरावांच्या कासेगावात धडक मारून शड्डू ठोकला आहे.
वाळवा तालुक्यातील कासेगाव व वाटेगाव ही शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावे महत्त्वाची मानली जातात. कासेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सरपंचांसह राष्ट्रवादीचे नऊ सदस्य, तर विरोधी शिवाजीराव नाईक गट, शिवसेना व काँग्रेस या सर्वांचे मिळून सहा सदस्य आहेत. कासेगाव येथे राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दनकाका पाटील, तर वाटेगावात पं. स. माजी सभापती रवींद्र बर्डे हे दोघे जयंतरावांच्या गटाचे नेतृत्व करतात; परंतु त्यांच्याच घरातील युवक नेते देवराज पाटील व राजेंद्र बर्डे यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे. त्याचा फायदा भाजपाचे आ. नाईक यांना होत आहे. त्यातून गत विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गावांत आ. नाईक यांनी बाजी मारली होती.
विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातील राजकीय समीकरणे रंग बदलणाºया सरड्याप्रमाणे बदलतात. आ. नाईक यांना शह देण्यासाठी राष्टÑवादीचे माजीआम. मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी पुन्हा एकत्र मोट बांधली आहे. या दोघांमागे जयंतरावांची ताकद आहे.आता मात्र या तिघांना शह देण्यासाठी आ. नाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सोबतीला घेऊन जयंतरावांचे गाव असलेल्या कासेगावात कोट्यवधींचा निधी आणला आहे. या विकासकामांचा प्रारंभ आणि उद्घाटन खोत यांच्या हस्ते ठेवून भाजपाचा फौजफाटा निमंत्रित केला आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन करून दोन भाऊंना धक्का देण्याचा प्रयत्नआम. नाईक आणि सदाभाऊ खोत करणार आहेत.
कासेगाव येथे झालेल्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीनेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रमाबद्दल आपले काहीही मत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सविस्तर बोलू.
- देवराज पाटील, माजी अध्यक्ष जि. प. सांगली.