शिराळे खुर्दच्या दोघांना खूनप्रकरणी जन्मठेप
By Admin | Published: February 16, 2017 11:19 PM2017-02-16T23:19:41+5:302017-02-16T23:19:41+5:30
इंग्रुळच्या महिलेची निर्दाेष मुक्तता : ‘खून का बदला खून’ न्यायातून प्रकार
इस्लामपूर : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील खूनप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी एका महिलेची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. ‘खून का बदला खून’ या न्यायातून हा प्रकार घडला होता.
आनंदा रामचंद्र पाटील (वय ४५, रा. शिराळे खुर्द, ता. शिराळा) व तानाजी ज्ञानदेव जाधव (३३, रा. पुनवत, ता. शिराळा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर जयश्री नीतेश ऊर्फ नथेश कुंभार (३९, रा. इंग्रुळ, ता. शिराळा) या महिलेची निर्दोष मुक्तता केली. वरील दोघा आरोपींनी दंडाची रक्कम न भरल्यास, त्यांना आणखी ३ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी : जयश्री कुंभार हिचा पती नथेश विष्णू कुंभार याच्याविरुध्द २0१२ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गणपती कुंभार महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांनी न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून जयश्री कुंभार हिने कट रचून गणपती कुंभार यांच्या खुनाची सुपारी आनंदा पाटील व तानाजी जाधव यांना दिली.
या दोघांनी डिसेंबर १३ मध्ये गणपती कुंभार यांना सोबत घेऊन, ‘गुऱ्हाळाचे काम देतो’ असे सांगून उदगीरच्या जंगलात नेले होते व तेथे त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यांचा मृतदेह तेथेच जंगलात टाकण्यात आला होता.
३ जानेवारी २०१४ रोजी हा खून उघडकीस आल्यानंतर, शिराळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन वरील आरोपींना अटक करण्यात आली होती.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे २० साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपास अधिकारी अनिल गुजर, बळीराम घुले यांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फिर्यादीतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी या खटल्याचे काम पाहिले. (वार्ताहर)