निवडणूक बैठकीवर शिराळ्यात बहिष्कार
By Admin | Published: October 18, 2016 11:17 PM2016-10-18T23:17:30+5:302016-10-18T23:17:30+5:30
नगरपंचायतीमार्फत बैठक : जिवंत नागपूजेला परवानगीसाठी लढा
विकास शहा -- शिराळा --शिराळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होणार आहे. मात्र जिवंत नागपूजेस परवानगी मिळत नाही तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिराळकरांनी घेतल्याने, सोमवारी शिराळा नगरपंचायतीमार्फत निवडणुकीबाबत चर्चा व विचारविनिमयासाठी घेण्यात आलेल्या बैठकीस एकही नागरिक उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. निवडणूक होण्यासाठी प्रशासनामार्फत टाकण्यात आलेल्या पहिल्या पावलावर शिराळकरांनी पाठ फिरविली आहे.
नागपंचमी हा शिराळकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. २००३ पासून नागपंचमी न्यायालयात अडकली आहे. सुरूवातीला अंतरिम संहितेमुळे येथील नागरिक जिवंत नागाची पूजा करीत होते. नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करता यावी यासाठी शिराळकरांनी अनेक बंधने स्वत:च घालून घेतली आहेत. मात्र गतवर्षी नाग पकडण्यावरच बंदी घातल्याने, हजारो वर्षांची जिवंत नागपूजेची येथील परंपरा खंडित झाली. त्यामुळे शिराळकरांनी आता ‘आर या पार’ अशी भूमिका घेतली आहे.
यावर्षी पार पडलेल्या नागपंचमीवेळी सर्व शहरात काळ्या गुढ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. तसेच काळ्या पताका आणि बहिष्काराचे फलकही शहरात तसेच मिरवणुकीवेळी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. आता येणाऱ्या सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेवर बहिष्कार, हे अस्त्र शिराळकरांनी उचलले आहे.
नागपंचमीनंतर न्यायालयीन लढ्यासाठी कृती समितीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागपंचमीला जिवंत नाग पूजेस परवानगी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली आहे. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होणार म्हणून, या बहिष्काराचे स्वरूप आणखी तीव्र करण्यात आले आहे.
‘या निवडणुकीसाठी जो कुणी उमेदवारी अर्ज भरेल, त्याला गाढवाची सवारी करण्यात येणार’ असे फलक चौका-चौकामध्ये लावण्यात आले असून, हा लढा तीव्र करण्यात आला आहे. निवडणूक बहिष्काराला आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँगे्रस, भाजप यांनीही पाठिंबा दर्शविल्याने, निवडणूक बहिष्काराला गावकऱ्यांबरोबरच आता पक्षीय पाठिंबाही मिळत आहे.
सोमवार दि. १७ रोजी येथील नामदेव मंदिरामध्ये दुपारी ४ वाजता ‘शिराळा नगरपंचायत निवडणूक २०१६’ यावर चर्चा व विचारविनिमयासाठी नागरिकांची बैठक नगरपंचायतीमार्फत घेण्यात आली होती.
मात्र नगरपंचायत मुख्याधिकारी अशोकराव कुंभार, तसेच कार्यालयीन कर्मचारी यांच्यासह कुणीही नागरिक या बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे ही बैठक रद्द करणे भाग पडले. त्यामुळे समन्वयासाठीचा आणि निवडणूक व्हावी यासाठीचा प्रशासनाचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
शिराळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत सहभागी व्हावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे. नागरिकांतून प्रतिनिधी निवडून आल्यावरच या नगरपंचायतीचा कारभार आणि शहराचा विकास चांगला होणार आहे. बहिष्कारातून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी समन्वयातून मार्ग काढावा, यासाठी सोमवारची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र एकही नागरिक उपस्थित न राहिल्याने बैठक रद्द करण्यात आली आहे.
- अशोकराव कुंभार, मुख्याधिकारी, शिराळा नगरपंचायत
शिराळ्यात इशाऱ्याचे फलक
निवडणूक बहिष्कारावर शिराळकर ठाम. या बहिष्कारास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप आदी पक्षांचा पाठिंबा
२७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात शिराळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.
‘निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्याला गाढवाची सवारी करण्यात येणार’, असे फलक शहरात झळकत आहेत.