शिरसगाव होतंय जलसमृद्ध गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:55 AM2017-10-13T00:55:37+5:302017-10-13T00:55:40+5:30

Shirsagarga is a water-rich village! | शिरसगाव होतंय जलसमृद्ध गाव!

शिरसगाव होतंय जलसमृद्ध गाव!

Next



प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या शिरसगाव येथील भूजल स्रोत वाढविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी डोंगरउतारावर श्रमदानातून समतल चरी खोदल्या आहेत. वृक्षारोपण करीत येथे मानवनिर्मित अभयारण्य साकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे शिरसगाव जलसमृद्ध गाव होत आहे. येथील प्रत्येक रहिवासी जलसंवर्धक होत आहे.
शासनाने शिरसगावची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड केली आहे. जनतेच्या सहभागातून जलसंधारण व मृदसंधारण कामांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यात यश येत आहे.
यावर्षी झालेल्या पावसाने शिरसगावच्या डोंगरकुशीतील तलाव तुडुंब भरला आहे. यावर्षी येथे पडणाºया पावसाचा थेंब न् थेंब साठवला गेला आहे. तलाव, बंधारे, ओढापात्र, डोंगरउताराच्या सलग समतर चरी पूर्ण भरल्याचे दिसले. कडेगाव तालुक्यात ‘जलयुक्त’च्या माध्यमातून टंचाईमुक्त होण्याचा पहिला मान शिरसगाव मिळवत आहे.
प्रत्येकाच्या खिशावर ‘जलसंवर्धक...’चा बिल्ला
येथील प्रत्येकाच्या खिशावर ‘जलसंवर्धक शिरसगाव’ हे दोनच शब्द लिहिलेला बिल्ला लवकरच दिसेल. यामुळे प्रत्येकाला जलयुक्त शिवार मोहिमेतील जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची प्रेरणा मिळेल, असे सरपंच सतीश ऊर्फ संभाजी मांडके यांनी सांगितले.
पाणी पाहून भारावले शिरसगावकर
ग्रामस्थ व महाविद्यालयीन तरुणांनी श्रमदानातून खोदलेल्या समतल चरींमध्ये साठलेले पाणी पाहून शिरसगावकरांना अतीव आनंद झाला. आता उन्हाळ्यातही आमच्या विहिरींमध्ये पुरेसे पाणी असेल, असा विश्वास येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Shirsagarga is a water-rich village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.