सांगलीमध्ये चार ठिकाणी मिळणार शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:44 PM2020-01-03T16:44:01+5:302020-01-03T16:45:31+5:30
गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सांगली शहरासाठी सुरुवातीला ४५० थाळी मंजूर करण्यात आल्या आहेत.
सांगली : गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सांगली शहरासाठी सुरुवातीला ४५० थाळी मंजूर करण्यात आल्या आहेत.
शिवभोजन योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना इतर भागात राबवण्यात येईल. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या सांगली शहरात ४५० थाळी मंजूर झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने गरीब व गरजू लोकांचा वावर असणाऱ्या परिसरांचा अभ्यास करून चार ठिकाणे निश्चित केली आहेत.
यामध्ये सांगली मार्केट यार्ड, मध्यवर्ती बसस्थानक, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) आणि कोल्हापूर रोडवरील विष्णुअण्णा पाटील फळमार्केट या जागांचा समावेश आहे. याठिकाणी मजूर, कष्टकरी व गरीब लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात. चारही ठिकाणी जिल्ह्यातून दररोज शेकडो नागरिक येत असतात. त्यामुळे शिवभोजन योजनेचा लाभ त्यांना याठिकाणी मिळू शकतो. ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधित सुरू राहतील.
पुरवठा विभागाने शासनाकडे या चारही जागांचा प्रस्ताव पाठविला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात भोजनालय उभारणीबाबत पाऊल उचलले जाणार आहे. शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पुरेशी जागा असणे गरजेचे आहे.
योजना राबविण्यासाठी सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येणार आहे. याकरिता महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.