शिवप्रताप मल्टिस्टेटमुळे इस्लामपूरच्या नावलौकिकात भर पडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:30 AM2021-03-01T04:30:55+5:302021-03-01T04:30:55+5:30
इस्लामपूर येथे विट्याच्या शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतापशेठ साळुंखे यांनी पी. आर. पाटील, शहाजी पाटील यांचे स्वागत केले. इस्लामपूर ...
इस्लामपूर येथे विट्याच्या शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतापशेठ साळुंखे यांनी पी. आर. पाटील, शहाजी पाटील यांचे स्वागत केले.
इस्लामपूर : शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेने आपल्या कार्याने पश्चिम महाराष्ट्रात नाव कमावले आहे. अल्पावधीत संस्थेने मोठी मजल मारली आहे. संस्थेचे संस्थापक प्रतापशेठ साळुंखे यांचे अजातशत्रू आणि दानशूर व्यक्तिमत्त्व संस्थेच्या यशाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
विटा येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेची इस्लामपूर येथे १३ वी शाखा सुरू करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जय हनुमान पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख शहाजी पाटील म्हणाले, सहकारात काम करीत असताना नेहमी ‘शिवप्रताप’चा आदर्श व प्रतापशेठ साळुंखे यांचे मार्गदर्शन होत असते. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, या सहकाराच्या उक्तीप्रमाणे दोन्ही संस्था काम करीत असतात.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे म्हणाले, संस्थेकडील पैसा हा जनतेचा असून तो पै ना पै सुरक्षित राहिला पाहिजे, याची जाणीव ठेवून पंचसूत्री धोरणावर काम करत असतो. त्यामध्ये साखर कारखाना, सूत गिरणीला कर्ज देत नाही. राजकीय व्यक्तीला कर्ज देत नाही. पै-पाहुणे संचालक यांना कर्ज देत नाही. सोने तारणाला प्रधान्याने कर्ज, उत्पादक गोष्टीला जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचे धोरण असते. अतिशय पारदर्शक आणि गुणात्मक व्यवसाय वाढीवर भर असतो.
कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी संस्थेचा आर्थिक आढावा घेतला. संस्थेची उलाढाल २५० कोटीची असून ठेवी १५० कोटींच्या, तर कर्ज वाटप १११ कोटीचे झाले आहे. आतापर्यंत संस्थेस १६ आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी गणपतराव पुदाले, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, सरपंच विजय पाटील, केतन शहा, धनंजय जाधव, व्यंकटराव पाटील, बी. आर. पाटील, तुळशीदास पाटील, डॉ. सरलादेवी पाटील, महाडिक क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सतीश महाडिक, शरद बांदल, माजी नगरसेविका लता कुर्लेकर, संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, आलम पटेल, गोपाळ तारळेकर, सीताराम हरुगडे, सुरेखा जाधव, रोहिणी जाधव, सरव्यवस्थापक धोंडीराम जाधव, सिकंदर शेख, सुजाता भिसे, हणमंत माळी, शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते.
शाखाधिकारी आनंदा उथळे यांनी आभार मानले.