‘शिवप्रताप’चा उपक्रम राज्यात आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:27+5:302021-06-09T04:33:27+5:30
विटा : कोरोना काळात साथ नियंत्रणात आणण्यासाठी धोका पत्करून गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविकांना त्यांच्या कामाची दखल घेऊन ...
विटा : कोरोना काळात साथ नियंत्रणात आणण्यासाठी धोका पत्करून गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविकांना त्यांच्या कामाची दखल घेऊन येथील शिवप्रताप मानव कल्याण संस्थेने दोन महिन्यांच्या मानधनाइतकी रक्कम दिली आहे. हा उपक्रम राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
आळसंद (ता. खानापूर) येथे शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्यावतीने कोरोना काळात काम करणाऱ्या आशा सेविकांना दोन महिन्यांच्या प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे देण्यात येणाऱ्या मानधनाचे वाटप डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जितेश कदम, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, प्रतापशेठ साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव साळुंखे यांनी हा आदर्श उपक्रम राबविला आहे. यापूर्वी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सॅनिटायझर, मास्क, गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप केले. तसेच नाभिक समाजालाही धान्याचे किट देऊन मदतीचा हात दिला आहे. कोरोना लाट गेलेली नाही, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी.
प्रांताधिकारी संतोष भोर यांनी कोरोना रोखण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नितीनराजे जाधव यांनी स्वागत तर अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. आशा स्वयंसेविका प्रतिनिधी सुरेखा जाधव यांनी आशा सेविकांच्या समस्या सांगून विमा संरक्षणाची मागणी केली. यावेळी सरपंच इंदुमती जाधव, संग्रामसिंह जाधव, सयाजीराव धनवडे, सीताराम हारुगडे, कृष्णत महाडिक, सुभाष सुर्वे, अजित जाधव, गणेश जाधव, रमेश शिरतोडे, सतीश सूर्यवंशी, प्रवीण जाधव, संभाजी सुर्वे उपस्थित होते. सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
फोटो : ०७ विटा १
ओळ : आळसंद (ता. खानापूर) येथे डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते आशा सेविकांना मानधन वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. जितेश कदम, प्रांताधिकारी संतोष भोर, विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते.