शिवसैनिकांनी पश्चिम महाराष्ट्रातील गड मजबूत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:31+5:302021-08-21T04:31:31+5:30
सांगली : कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधावा. पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. प्रामाणिकपणे काम करत ...
सांगली : कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधावा. पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. प्रामाणिकपणे काम करत पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा गड मजबूत करावा, असे आवाहन शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सांगलीत केले.
सांगलीत शुक्रवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील उपस्थित होते.
दिवाकर रावते म्हणाले की, शिवसेनेच्या जन्मापासून मी आजअखेर शिवसैनिक म्हणून काम करत आहे. राज्यात पक्ष बांधणीसाठी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडत आहे. जो कार्यकर्ता संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करतो, त्याच कार्यकर्त्याला पक्षाचा मानसन्मान मिळतो हा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपले काम आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार पट्ट्यामध्ये शिवसैनिक जोमाने कामाला लागला तर हा गड शिवसेनेचा होईल, यात शंका नाही.
नितीन बानगुडे पाटील म्हणाले की, या जिल्ह्यात शिवसेनेने अतिशय ताकदीने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आपला वरचष्मा कायम ठेवेल. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, सुजाता इंगळे, छायाताई कोळी, शंभूराज काटकर, सुभाष मोहिते, नंदकुमार निळकट, सचिन कांबळे, मिलिंद कदम आदी उपस्थित होते.