शेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:51 PM2020-10-17T17:51:41+5:302020-10-17T17:53:10+5:30
farmar, rain, shivsena, sanglinews, गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.
सांगली : गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.
पत्रकात विभूते यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे उध्दव ठाकरे यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना पिकविम्या द्वारे मदत मिळावी म्हणून तत्कालीन भाजप सरकारवर आणि कंपन्यांवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे हित साधले होते. ती कृती महाराष्ट्र विसरलेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन साथ देईल असे जाहीर केले आहे. मात्र लोकांचे नुकसान किती झाले याचा खरा अंदाज येण्यासाठी पंचनामे ही आवश्यक बाब आहे. यंत्रणा याकामी आपली जबाबदारी पार पाडत असली तरी शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या पक्षाचा गावचा घटक म्हणून प्रत्येक शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ८० टक्के समाजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. आपण त्याला जागून आपली जबाबदारी पार पाडीत राहूया.
सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचा आधार बनून त्यांचा भाऊ म्हणून शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आपल्या गावातील किती लोकांचे पंचनामे झाले, किती राहिले, किती दिवसात पूर्ण होणार याची माहिती आपल्याकडे ठेवावी.
यासाठी सहकार्य केले नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योग्य समज देण्याचे काम आपण करू. मात्र एकही शेतकऱ्याचा पंचनामा झाला नाही असे होऊ नये यासाठी सर्व शिवसैनिकांनी जागृकपणे कार्य करावे तसेच कोणाचा पंचनामा राहीला तरी काळजी न करता स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय विभूते व आनंदराव पवार यांनी केले आहे.