शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जुंपली
By admin | Published: July 9, 2014 12:30 AM2014-07-09T00:30:38+5:302014-07-09T00:34:59+5:30
दोन मतदारसंघांचा तिढा : दोन्ही पक्षांना हव्यात पाच जागा
सांगली : महायुतीच्या वाऱ्यावर स्वार होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेने महायुतीमध्ये जागांचा गुंता अधिक जटिल होताना दिसत आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचालीनंतर जागा वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेचे नेते भडकले आहेत. दुसरीकडे भाजपने दिग्गज नेत्यांना मतदारसंघ उपलब्ध करून देण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. तीन मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेला आजवर सांगली जिल्ह्यात विधानसभा अथवा लोकसभेच्या निवडणुकीत कधीही यश मिळाले नाही. दुसरीकडे भाजपचे तीन आमदार असल्यामुळे तुलनेते त्यांची ताकद अधिक आहे. याच ताकदीच्या जोरावर त्यांनी विधानसभेच्या पाच जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. या पाच जागांमध्ये सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ आणि पलूस-कडेगाव यांचा समावेश आहे. दुसरीकडे शिवसेनेने इस्लामपूर, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी आणि पलूस-कडेगावची मागणी केली आहे. मुंबईत सोमवारी पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांनीही सांगली जिल्ह्यात पाच जागांवर हक्क सांगितला. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही काही जागांची मागणी केली आहे. भाजप-सेनेतच जागा वाटपावरून जुंपल्याने स्वाभिमानी संघटनेची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)