सांगली जिल्हा नियोजनमध्ये शिवसेना-भाजप फिफ्टी फिफ्टी ‘फॉर्म्युला’
By अशोक डोंबाळे | Published: December 16, 2023 05:45 PM2023-12-16T17:45:02+5:302023-12-16T17:46:29+5:30
अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये भाजप- शिवसेना (शिंदे गट) युतीने ५०-५० असा ‘फॉर्म्युला’ला स्वीकारला आहे. ...
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने ५०-५० असा ‘फॉर्म्युला’ला स्वीकारला आहे. उर्वरित चार जागांवर जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष, आठवले गट, रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी एक जागा दिली आहे. जिल्हास्तरावरुन निवडीची यादी निश्चित करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हा नियोजनच्या स्वीकृत सदस्यांची यादी कधी मंजूर करुन घेणार आहेत, असा प्रश्नही इच्छुक सदस्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेतील नेत्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नेते खासगीत करताना दिसून येत होते. जिल्हा पातळीवरील विविध समित्यांवर भाजप नेत्यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेच्या नेत्यांची नावे मागवली जातात; पण ऐनवेळी ती वगळण्यात येतात. या तक्रारीमुळेच जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांसाठी ५०-५० ‘फॉर्म्युला’प्रमाणे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची नावे निश्चित केली आहेत.
या निवडीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांनाच संधी मिळाली आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, तासगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांना भाजपच्या नेत्यांनी संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांना संधी मिळाली आहे.
जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपने मित्र पक्षांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे लक्ष्मण सरगर, आठवले गटाचे पोपट कांबळे आणि रयत क्रांती संघटनेकडून विनायक जाधव यांना संधी देण्यात आली आहे. या १२ सदस्याची नावे मंजूरीसाठी शासनाकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये पाठविली आहे. पण, अद्याप शासनाकडून या सदस्यांची यादी निश्चित होऊन प्रशासनाकडे आली नाही. याबद्दल इच्छुक सदस्यांत उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
जिल्हा नियोजनचे संभाव्य सदस्य
विलासराव जगताप, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, सुनील पाटील (भाजप), आनंदराव पवार, सुहास बाबर, भीमराव माने, तानाजी पाटील (शिंदे गट शिवसेना), समित कदम (जनसुराज्य), लक्ष्मण सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष), पोपट कांबळे (आठवले गट), विनायक जाधव (रयत क्रांती).
जिल्हा प्रशासनाने आमच्याकडून नियोजन समिती सदस्यत्वासाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरुन घेतले आहेत. १२ सदस्यांची नावेही शासनाकडे गेली असून त्यास अंतिम मंजुरी मिळाली नाही. लवकरच शासनाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नियोजनच्या येत्या सभेला आम्ही असणार आहे. - सत्यजित देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप.