राष्ट्रवादी, काँग्रेसविरोधात शिवसेनेने दिला उद्धव ठाकरेंना अहवाल
By अविनाश कोळी | Published: April 25, 2023 07:54 PM2023-04-25T19:54:57+5:302023-04-25T19:55:04+5:30
दगाफटका केल्याची तक्रार : अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी
सांगली : जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्याचा बनाव करीत काँग्रेस व राष्ट्रवादीने दगाफटका केल्याबाबतचा अहवाल शिवसेना जिल्हाप्रमुखांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. यात शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हकालपट्टीची मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांच्या मतानुसार हा अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे पॅनेल मैदानात उतरले आहे, मात्र आघाडी करूनही बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचा सहभाग म्हणून अजितराव घोरपडेंना जागा दिल्या गेल्याने जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी नाराजी व्यक्त केली होती.
एक व्यक्ती म्हणजे संपूर्ण पक्ष नसतो, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त करीत स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.केवळ स्वबळाचा नारा देऊन शिवसेना पदाधिकारी शांत बसले नाहीत. त्यांनी जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी तसेच स्वकीयांनी दगाफटका केल्याची तक्रार करीत रितसर अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यामुळे महाआघाडीअंतर्गत राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
घोरपडे यांच्याबद्दल नाराजी
अजितराव घोरपडे यांनीही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता महाविकास आघाडीत सहभागी झाल्याबाबत विभुते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अहवालात त्यांनी घाेरपडे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील यांच्याशी संघर्ष
विभुते यांची सर्वाधिक नाराजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर असल्याचे दिसून आले. यापूर्वीही विभुते यांनी अनेकदा जयंत पाटील यांच्या विरोधात ठाकरेंकडे तक्रार केली आहे.
जिल्ह्यातील निवडणुकीत मित्रपक्षांनी कसा दगाफटका केला त्याचा लेखी अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविला आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेनेला स्पष्टपणे डावलले गेले आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा संदेश आम्ही देणार आहोत.- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)