शिवसेनेतील गटबाजीतून मिरजेत तरुणावर हल्ला
By admin | Published: July 17, 2014 12:27 AM2014-07-17T00:27:02+5:302014-07-17T00:28:18+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा : लोखंडी गजाने डोक्यात वार
मिरज : मिरजेत शिवसेनेच्या दोन गटांतील वादातून महादेव भागोजी हुलवान (वय २३) या कार्यकर्त्यावर आज, बुधवारी लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
महादेव हुलवान व दिग्विजय ऊर्फ विजय क्षीरसागर या धनगर गल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांत वाद आहे. शिवसेनेत पद न मिळाल्याने क्षीरसागर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महादेव हुलवान याने शिवसेना उपशहरप्रमुखपदाची मागणी केल्यानंतर क्षीरसागर याने त्यास विरोध केला होता. क्षीरसागर गटाच्या संतोष बंडगर यास उपशरहप्रमुखपद मिळाल्याने हुलवान व क्षीरसागर यांच्यातील वाद विकोपाला गेला.
रविवारी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकरिता इस्लामपूर येथे जाण्यासाठी क्षीरसागर व हुलवान यांच्यात बाचाबाची झाली होती. दोघांच्याही तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले होते. आज दुपारी महादेव हुलवान एमएच १० के ३०२१ क्रमांकाच्या रिक्षातून आंबेडकर उद्यानाजवळून परमशेट्टी रुग्णालयाकडे जात असताना एमएच १० एसी ७१७ क्रमांकाच्या मोटारीतून आलेल्या दिग्विजय क्षीरसागर याने रिक्षाला पाठीमागून ठोकरले. मोटारीने ठोकरल्याने रिक्षा उलटल्यानंतर दिग्विजय क्षीरसागर व त्याचा साथीदार अनिल सिध्दू हुलवान (रा. धनगर गल्ली मिरज) यांनी लोखंडी गजाने डोक्यात व पायावर वार केले. मारहाणीत महादेव हुलवान याचा पाय मोडला असून, त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महादेव हुलवान याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.