शिवसेना, जनता दलाची शिष्टाई
By Admin | Published: November 2, 2014 12:37 AM2014-11-02T00:37:58+5:302014-11-02T00:39:40+5:30
आयुक्तांशी चर्चा : एलबीटीबाबत कारवाईत घाई न करण्याची मागणी
सांगली : एलबीटीप्रश्नी व्यापारी व महापालिकेमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबावा म्हणून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील व शिवसेनेचे गौतम पवार यांनी आज शिष्टाईचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी त्यांनी आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. कारवाईबाबत घाई न करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आले नाही. कर भरण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केल्यानंतर आपण कारवाई करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त अजिज कारचे यांनी व्यक्त केली.
सांगलीच्या एलबीटी प्रश्नावर फौजदारी तसेच तपासणीच्या कारवाईच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या या तयारीनंतर व्यापारी व महापालिकेत संघर्ष निर्माण झाला आहे. टोकाचा संघर्ष होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांची आज भेट घेतली.
व्यापाऱ्यांना या कराचा त्रास होत आहे. तुमच्या कारवाईमुळे पेठ बंद करण्याचा तसेच आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली. आयुक्तांनी व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या व्यक्तीगत टीकेचाही उल्लेख केला. शहराचा विकास महत्त्वाचा आहे. महापालिकेचे कामकाज कराअभावी ठप्प होत असेल, तर कारवाई करावीच लागेल. त्यांनी आमच्याशी संघर्ष करण्यापेक्षा राज्य शासनाशी लढले पाहिजे.
स्थानिक पातळीवर केवळ राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. व्यापाऱ्यांनी या गोष्टी समजून न घेता करावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी कर भरण्यास सुरुवात करावी. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार दिवसापासून व्यापारी व आयुक्तांमध्ये एलबीटीवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)