रस्ते दुरुस्तीसाठी मिरजेत शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:50+5:302021-09-09T04:32:50+5:30
मिरज : मिरजेत रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा ...
मिरज : मिरजेत रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरू होत असून, गणेशाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे गांधी चौकातून महापालिकेवर वाजतगाजत मोर्चा काढण्यात आला. शहरात खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल सुरु आहेत. शहरात सर्वच ठिकाणी ड्रेनेज यंत्रणा खराब झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी साचत आहे. याबाबत महापालिकेने उपाययोजना कराव्यात, यासाठी शिवसेनेने महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विजय शिंदे, किरण रजपूत, ओंकार जोशी, संदीप पाटील, गजानन मोरे सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहर अभियंता संजय देसाई यांना मागण्यांचे निवेदन देऊन रस्ते दुरुस्तीबाबत चार दिवसात उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
चौकट
नवीन रस्त्यावरील डांबर वाहून गेले
मिरजेत सर्वच रस्ते पावसाने खराब झाले आहेत. नवीन केलेल्या रस्त्यावरील डांबर पावसाने वाहून गेले आहे. मात्र, याकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.