‘म्हैसाळ’साठी ८ पासून शिवसेनेचा चक्काजाम
By admin | Published: December 31, 2015 11:33 PM2015-12-31T23:33:53+5:302015-12-31T23:58:02+5:30
दिनकर पाटील : कवठेमहांकाळमध्ये आंदोलन
कवठेमहांकाळ : शेतीला म्हैसाळचे पाणी आणि जनावरांना चारा देण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंद आणि तहसील कार्यालयाच्या आवारात एकतारी भजन करून शिवसेनेने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते. परंतु शासनाला जाग आली नाही. हा लढा आणखी तीव्र करणार आहे. ८ जानेवारीपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असून, म्हैसाळचे पाणी सुरू होईपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
पाटील म्हणाले की, म्हैसाळचे पाणी दीड महिन्यापासून बंद आहे. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामातील पिके जळून चालली आहेत. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील जनावरे चाऱ्याअभावी तडफडू लागली आहेत. दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना त्वरित चालू करावी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अग्रणी पात्रातील बंधारे भरून द्यावेत. ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ चारा डेपो सुरू करावेत, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमची पहिली बांधिलकी जनतेच्या प्रश्नांशी आहे. जनता दुष्काळात होरपळत असताना आणि चाऱ्याअभावी तडफडणारी जनावरे कसायाकडे नेण्याची वेळ असताना, हे विदारक वास्तव आता उघड्या डोळ्यांनी बघत बसणार नाही. येत्या आठ जानेवारीपासून शिवसेनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आठ तारखेपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरून चक्काजाम करतील. जोपर्यंत पाणी आणि चारा डेपो सुरू होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला आहे. यावेळी संजय चव्हाण, अनिल बाबर, दिलीप गिड्डे, अनिल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)