सांगलीतील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर ‘नॉट रिचेबल’, आघाडी सरकारबाबत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:59 PM2022-06-21T13:59:10+5:302022-06-21T14:46:41+5:30
राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार बाबर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखविली होती.
सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबरही मंगळवारी सकाळपासून 'नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी सकाळी ते मुंबईत असल्याचे सांगितले, मात्र आमदार बाबर यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मंगळवारी सकाळपासून ते ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे आ. बाबर यांच्या भूमिकेविषयी ऊलटसुलट चर्चा सुरु आहे.
बाबर यांची नाराजी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार बाबर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखविली होती. सत्तेत असूनही मतदारसंघातील अनेक कामे होत नसल्याचे व जी कामे झाली त्याचे श्रेय राष्ट्रवादी नेते लाटत असल्याची खदखद त्यांच्या मनात होती. त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा शिरकावही त्यांना खटकत होता. त्यामुळे बंडखाेरांच्या गटाकडे ते गेल्याच्या चर्चेने त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले नाही.
एकनाथ शिंदे सूरतमध्ये
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.