काँग्रेसच्या आंदोलनात शिंदे गटाचे खासदार; शक्तिपीठ महामार्गावरुन धैर्यशील मानेंचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 01:42 PM2024-06-22T13:42:38+5:302024-06-22T13:46:35+5:30
Eknath Shinde : गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधात आंदोलन सुरू केले असून या प्रोजेक्टला जोरदार विरोध सुरू केला आहे.
Eknath Shinde ( Marathi News ) : राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध सुरु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही विरोध सुरू केला आहे. आज सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले आहे. जिल्हाधीकारी कार्यालयात याबाबत निवेदन दिले. यावेळी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. यामुळे आता खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिल्याची जोरदार चर्चा आहे.
Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटूच. पण संसदेमध्ये सुद्धा याबाबत आवाज उठवू. देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही', असंही धैर्यशील माने म्हणाले.
'शक्तिपीठ'ला शेतकऱ्यांचा विरोध
राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध सुरु झाल्याने याच्या भूसंपादनाला राज्य सरकारने नुकतीच स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्याने स्थगितीपेक्षा हा महामार्गच कायमचा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेच्या तोंडावर तात्पुरती स्थगिती देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक तर करत नाही ना? अशी भीती व्यक्त करत या महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने कंबर कसली आहे.
नागपूर-गोवा हा प्रस्तावित ८०२ कि.मी.चा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार असून यामध्ये २७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. या महामार्गात पिकाऊ जमीन जाणार असल्याने याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे लोन उसळले आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवल्याने आता महायुतीचे लोकप्रतिनिधीही या महामार्गाविरोधात उघडपणे बोलू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विट असे म्हटले आहे की, हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.