शिवसेना खासदारांची शिराळ्यात भाजपशीच जास्त जवळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:03+5:302021-07-16T04:19:03+5:30
शिराळा : खासदार धैर्यशील माने तालुक्यात विकासकामे करताना येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यांची भाजप पदाधिकाऱ्यांशीच जवळीक ...
शिराळा : खासदार धैर्यशील माने तालुक्यात विकासकामे करताना येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यांची भाजप पदाधिकाऱ्यांशीच जवळीक आहे. खासदारांच्या या कारभाराला कंटाळून आपण तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष हिरुगडे यांनी सांगितले.
हिरुगडे म्हणाले की, मी २०१९पासून शिवसेना तालुकाध्यक्ष आहे. शिवसैनिक म्हणून २००१पासून काम केले आहे. सात वर्षांपासून राज्यात सत्ता असतानासुध्दा आम्ही मागणी केलेली कोणतीही कामे तालुक्यात झालेली नाहीत. भाजपचे पदाधिकारी खासदारांच्या जवळ असल्याने त्यांनाच विविध समित्यांवर वारंवार संधी दिली आहे. संबंधित पदाधिकारी शिवसैनिकांना भाजपमध्ये जाण्याकरिता प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात रागाची भावना निर्माण झालेली आहे. निष्ठावंत शिवसैनिकांची गळचेपी होत आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांत वरिष्ठ नेते, खासदारांनी भाजपसोबत काम केल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे. खासदारांनी शिवसैनिकांना कधीही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मला या पदावर काम करण्यात अडचणी येत आहेत. तालुकाप्रमुख म्हणून काम करताना पूर्ण अधिकार कधीही दिला नाही. त्यामुळे तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक होतो व यापुढेही काम करत राहणार आहे.