अखंड हिंदुस्थानसाठी शिवसेना आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:04+5:302021-01-24T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून देशाच्या नोटेवर शिवछत्रपती, संभाजी महाराजांची प्रतिमा छापायची आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून देशाच्या नोटेवर शिवछत्रपती, संभाजी महाराजांची प्रतिमा छापायची आहे. या गोष्टी शिवसेनेच्या कार्यातूनच होणे शक्य आहे, असे मत शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
येथील स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजीराव भिडे उपस्थित होते. ते म्हणाले, प्राणिमात्रांना जगण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू व सूर्यप्रकाशाची जशी गरज आहे, तशीच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे काम आपण वाढवूया. एका चौकाचे नामकरण करून उपयोग नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे व बाळासाहेबांचे नाव झाले पाहिजे.
संपूर्ण देशात शिवसेना उभी करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची धडपड आपण केली पाहिजे. ती धडपड हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. सांगलीत दोनशे ते अडीचशे शाखा का नाहीत. शाखा वाढल्या पाहिजेत. लोकसेवा तत्पर ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवायला हवा. पद, पैसा व प्रतिष्ठा शुल्लक असून शिवसेना व बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी धडपडत राहायला हवे. सांगलीतील चौकाचे नामकरण २५ वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भाजपचे शेखर इनामदार, प्रसाद रिसवडे, नगरसेविका स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट
भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे कौतुक
कार्यक्रमास अनेक भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना भिडे यांनी शिवसेनेवर कौतुकाचा वर्षाव केला. हे राजकीय मत नसून राष्ट्रीय मत असल्याचा उल्लेखही भिडे यांनी केला.