निवडणुकीपुरती शिवसेना लोकांत येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:40+5:302021-07-14T04:30:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : निवडणुकीपुरती शिवसेना लोकांमध्ये येत नाही. लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून येणारा हा पक्ष आहे, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : निवडणुकीपुरती शिवसेना लोकांमध्ये येत नाही. लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून येणारा हा पक्ष आहे, असे मत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने सोमवारी सांगलीच्या गणपती मंदिरापासून संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली. अभियानाचे उद्घाटन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ही संपर्क यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेना जिल्हा कार्यालयाला भेट देऊन रिसाला रोड, बदाम चौक, नळभाग, नगारजी गल्ली, खणभाग या परिसरातून काढण्यात आली. संघटक दिगंबर जाधव यांच्या निवासस्थानी यात्रा थांबून परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नितीन बानुगडे-पाटील म्हणाले की, कोरोनाचे सर्व नियम पाळून अभियान सुरू करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना आम्ही तसे आवाहन केले आहे. नियम न मोडण्याची सूचना दिली आहे. लोकांच्या विश्वासावर हा पक्ष मजबूत आहे. कोणाचे बळ वाढले किंवा कमी झाले म्हणून शिवसेनेची ताकद कमी-जास्त होत नाही. जनतेचा पक्षावरील विश्वास हेच शिवसेनेचे बळ आहे. राज्यात आमची सत्ता आहेच; पण लोकांमध्ये असलेला हा विश्वास अधिक वाढावा म्हणून आम्ही हे अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेची काळजी उद्धव ठाकरे घेतच आहेत, मात्र आम्ही अभियानातून लोकांशी संवाद साधून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत आहोत.
अभियानात आ. अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभूते, संघटक दिगंबर जाधव, उपजिल्हाप्रमुख दिगंबर जाधव, बजरंग पाटील, सुजाता इंगळे, संदीप गिड्डे, अरुण खरमाटे, अमोल पाटील, आदी सहभागी झाले होते.