विद्युत पुरवठा तोडण्याच्या कारवाईस शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:46 AM2021-02-18T04:46:50+5:302021-02-18T04:46:50+5:30
सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना शिवसेनेच्यावतीने बुधवारी निवेदन देण्यात आले. यावेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, जितेंद्र शहा उपस्थित ...
सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना शिवसेनेच्यावतीने बुधवारी निवेदन देण्यात आले. यावेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, जितेंद्र शहा उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : थकीत विद्युत बिलापोटी विद्युतपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सध्या सुरू केली आहे. त्यास विरोध करीत, कारवाईस सहा महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली.
सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना शिवसेनेच्यावतीने बुधवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या महावितरण कंपनीकडून थकीत विद्युत बिलापोटी कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. तूर्तास ६ महिन्यापर्यंत वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई स्थगित करावी. थकीत वीजबिल भरण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व रकमेचे दहा हप्त्यात टप्प्या-टप्प्याने वीजबिल भरून घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता टप्प्या-टप्प्याने वीज बिल भरून घ्यावे. महावितरण कर्मचारी मनमानी करून सरकारचा आदेश असल्याचे सांगून राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. वीजपुरवठा तोडताना कर्मचाऱ्यांकडून कारवाईची नोटीस मोबाईलवर काढल्याचे तसेच राज्य शासनाकडून आदेश असल्याचे सांगितले जात आहे. सरकारचे नाव सांगून सुरू असलेली बदनामी थांबवावी.
यावेळी अधीक्षक अभियंता पेठकर यांनी, योग्य त्या सूचना देण्याचे व सुलभ हप्त्यात थकीत वीज बिल भरून घेण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, जितेंद्र शहा उपस्थित होते.