किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:02 PM2022-04-07T14:02:58+5:302022-04-07T14:03:41+5:30
‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’
सांगली : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लोकवर्गणीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने गुरुवारी सांगलीत निदर्शने केली.
सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. ‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’, ‘युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेत्याचा निषेध असो’, असे फलक झळकावत जिल्ह्यातील शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबत शिवसेनेने जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, १९७१ च्या युद्धात अतुलनीय पराक्रम करणाऱ्या आयएनएस विक्रांत या देशगौरवी युद्धनौकेच्या जतन आणि संवर्धनासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे नाटक करून भाजपच्या किरीट सोमय्या आणि त्याच्या टोळीने भ्रष्टाचार केला. हडप केलेली रक्कम ५८ कोटीच्या घरात असल्याचे समजते. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राजभवनाकडे अशाप्रकारे कोणत्याही रकमेचा भरणा झालेला नाही. याचाच अर्थ लोकांच्या देशभक्तीच्या भावनेला आपल्या चंदा गोळा करण्याच्या उद्योगासाठी पणाला लावून किरीट सोमय्या आणि त्याच्या टोळीने ही रक्कम हडप केली आहे.
मनी लॉन्ड्रिंग केलेल्या या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी करावी. संबंधितांना अटक करून हडप केलेले ५८ कोटी वसूल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात दत्ता इंगळे, चंदन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महादेव मगदूम, विशाल सिंग राजपूत, हरीदास लेंगरे, मयूर बोडके, हेमाताई कदम, सुनिता पाटील, मनीषा पाटील, रुपेश मोकाशी, नितीन काळे, राम काळे, किशोर पाटील, सचिन कांबळे, गजानन मोरे, सुगंधा माने, शकीला जमादार, तमन्ना सातार्डेकर, कमल सोनटक्के, गीता गडकरी, लक्ष्मी बामणे, सरोजनी माळी आदी सहभागी झाले होते.