युती तुटण्यास सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार
By admin | Published: October 12, 2014 12:50 AM2014-10-12T00:50:51+5:302014-10-12T00:53:29+5:30
उमा भारती : खानापूर येथे प्रचार सभा, शिवसेनेवर हल्लाबोल
खानापूर : राष्ट्रवादीचे पैशावर, कॉँग्रेसचे भ्रष्टाचारावर, तर शिवसेनेचे राजकारण धमकीवर चालते. अशा राजकारणाला भाजपचा प्रखर विरोध आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. तसे असते तर अजून शिवसेनेचे अनंत गीते केंद्र सरकारमध्ये राहिले नसते. त्यामुळे महाराष्ट्रात सेना-भाजपची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी आज (शनिवारी) खानापूर येथे केला.
उमा भारती म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हे माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल मला आदर आहे. परंतु, युती तुटण्यास भाजप कारणीभूत नसून, शिवसेनाच कारणीभूत आहे. वाजपेयी, अडवाणी हे जिथे वाद असेल व प्रश्न अवघड असेल तेथे मला पाठवत. मी माझी जबाबदारी यशस्वी पार पाडत होते. त्यामुळे मला ‘फायर ब्रॅण्ड’ म्हणून ओळखले जाते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मला जलसंधारण मंत्रालय दिले. त्यामुळे मी ‘वॉटर ब्रॅण्ड’ बनले. यापूर्वी जलसंधारणाची कामे राज्य शासन करीत होते. यात दिरंगाई होत आहे. कामे अपुरी रहात आहेत. हे केंद्राच्या लक्षात येत असून, अपुरी कामे पूर्ण करण्यास केंद्र विशेष उपाययोजना करणार आहे. यामध्ये टेंभू योजनेचा प्रश्न सोडविण्यात येईल. या योजनांना केंद्र पैसे देणार, परंतु त्याचा हिशेबही घेणार आहे. अग्रणीसारख्या हंगामी नद्या बारमाही करण्याचा उपक्रम भाजप राबवेल.
खा. संजय पाटील म्हणाले की, आतून एक आणि बाहेरून एक या संस्कृतीचा मी कार्यकर्ता नाही. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील ५० टक्के मते मी भाजपला देणार असल्याचे दाखविणार आहे. टेंभूच्या नावाने २० वर्षे मते मागितली. परंतु, आघाडी शासनास योजना पूर्ण करता आली नाही.
यावेळी रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, बंडोपंत देशमुख, तालुकाध्यक्ष अॅड. गणेश देसाई, सौ. शुभांगी सुर्वे, अनिल म. बाबर, दिलीप आमणे उपस्थित होते. (वार्ताहर)