Sangli- मिरजेत शिवसेना शिंदे-ठाकरे गट कमानीच्या वादावर अखेर पोलिसांचा तोडगा, पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:53 PM2023-09-16T17:53:34+5:302023-09-16T17:58:16+5:30
वादग्रस्त देखाव्यास प्रतिबंध
मिरज : मिरजेतील गणेशोत्सवात उभारण्यात येणाऱ्या स्वागतकमानीवर दावा करणाऱ्या शिंदे व उद्धव ठाकरे गटास दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वागतकमानीची परवानगी देऊन पोलिसांनी या प्रकरणावर तोडगा काढला आहे. दोन्ही गटांच्या स्वागतकमानी समोरासमोर होणार आहेत. वादग्रस्त देखाव्यास परवानगी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटाने ऐतिहासिक देखावा साकारण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उंच व भव्य स्वागतकमानी हे मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या कमानींवर देखावे साकारण्यात येतात. गतवर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने मार्केट परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागतकमानीवर दावा केल्याने दोन्ही गटांत वाद झाला. प्रशासनाने मध्यस्थी करून ठाकरे गटाला कमान व त्यासमोर शिंदे गटाला स्वागतकक्ष उभारण्यास परवानगी देऊन हा वाद मिटविला होता. यावर्षी पुन्हा शिंदे गटाचे शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी शिवसेनेच्या स्वागतकमानीवर दावा केल्याने ठाकरे गटाने विरोध केला.
शिवसेना कोणाची या वादाबाबत निवडणुक आयोगाने निर्णय दिल्याने स्वागतकमान आमचीच असा शिंदे गटाचा दावा होता. शिवसेनेचे नाव व चिन्ह शिंदे गटाला मिळाले असल्याने पक्षाच्या स्वागत कमानीसाठी शिंदे गटाने आग्रह धरल्याने ठाकरे गटानेही कमान आमचीच असा पावित्रा घेतला. या वादामुळे दोन्ही गटांना नेहमीच्या जागेवर कमान उभारण्याची परवानगी न देण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. कमान कोणाची या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मार्केटमधील नेहमीच्या जागी परवानगी न देता लक्ष्मी मार्केट इमारतीसमोर शिंदे गटाला व किल्ला रस्त्यावर ठाकरे गटाला स्वागतकमानीस परवानगी देण्यात आली. दोन्ही गटांनी हा तोडगा मान्य केल्याने वाद संपुष्टात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लक्ष्मी मार्केटसमोर नवीन कमानीमुळे तेथे असणाऱ्या कमानी व स्वागतकक्षांना अडचण होणार आहे. यामुळे महापालिका व पोलिसांचा स्वागतकक्ष श्रीकांत चाैकात हलविण्यात येणार आहे.
वादग्रस्त देखाव्यास प्रतिबंध
ठाकरे गटाने स्वागतकमानीवर ४० गद्दारांचे व्यंगचित्र साकारण्याची तयारी केली होती. याविरोधात शिंदे गटानेही आक्रमक पावित्रा घेतला. वादग्रस्त देखाव्यास परवानगी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी घूमजाव केले. आता ठाकरे गटाच्या कमानीवर सुरतेची लूट व शिंदे गटाच्या कमानीवर शिवराज्याभिषेक साकारण्यात येणार आहे.