वारणाली हॉस्पिटलचे शुक्रवारी भूमिपूजन करण्याचा शिवसेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:26+5:302021-06-17T04:19:26+5:30
कुपवाड : वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शिवसेनेने न्यायालय आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि ...
कुपवाड : वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शिवसेनेने न्यायालय आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि महापालिका प्रशासन शिवसेनेला डावलून शनिवारी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारीच भूमिपूजन करणार असून, मंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी यांनी पत्रकार बैठकीत दिला.
मोकाशी म्हणाले की, महापालिका क्षेत्रासाठी शासनाकडून वारणालीमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागेच्या वादात अडकल्याने ते गेली काही वर्षे रखडले होते. पाच कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने वाघमोडेनगर येथे जागा विकत घेऊन तेथे हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत केला होता. हा ठराव विखंडीत करण्यासाठी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी वेळावेळी मुंबईला जाऊन आम्ही पाठपुरावा केला आहे.
आता महापालिका व राष्ट्रवादीच्यावतीने भूमिपूजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आम्ही पाठपुरावा करूनही शिवसेनेला विश्वासात न घेता कार्यक्रम घेण्याचा घाट घातला आहे. याची नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
तसेच डावलून कार्यक्रम घेतल्यास शुक्रवारीच कार्यक्रम घेण्यात येईल. तसेच मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा मोकाशी यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा संघटक दिगंबर जाधव, जिल्हा संघटक बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, नानासाहेब शिंदे, सांगली शहर परमुख मयूर घोडके, महेंद्र चंडाळे, किशोर ठाणेकर, आदी उपस्थित होते.