जिल्ह्यात शिवसेना पाच जागी लढणार
By admin | Published: May 24, 2014 12:32 AM2014-05-24T00:32:04+5:302014-05-24T00:42:29+5:30
आनंदराव पवार यांची माहिती
इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतील यशामुळे मित्रपक्षांतील अनेक हौसे-नवसे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत; मात्र इस्लामपूरसह जिल्ह्यातील पाच मतदारसंघात शिवसेना धनुष्य-बाणाच्या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी दिली. पूर्व भागाचे जिल्हाप्रमुख संदीप सुतार यांनी भाजपकडून यापुढे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, त्यांनी काही गडबड केलीच तर आमचे उमेदवार सर्व ठिकाणी तयार आहेत, अशी तोफ डागली. येथील स्वराज्य भवनात घेतलेल्या पत्रकार बैठकीत पवार व सुतार यांनी संयुक्तपणे शिवसेनेची भूमिका मांडली. पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी असे पाच मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क नेते आ. दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील राजकीय स्थिती, शिवसेनेचे संघटन, शिवसैनिकांमधील निवडणूक लढवण्याची भावना अशा विषयांवर माहिती दिली आहे. येत्या निवडणुकीत पुरस्कृत किंवा सहयोगी उमेदवारी असा प्रकार असणार नाही. जे इच्छुक आहेत त्यांनी प्रथम शिवसेनेत प्रवेश करायला हवा. त्यानंतरच उमेदवारीचा विचार केला जाणार आहे. तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची भूमिका आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, अजिंक्य पाटील, नंदकुमार निळकंठ, विजयसिंह माने-पाटील, युवराज निकम, अनिल पाटील, लाला गोंदील, सुभाष मोहिते, दिनकर पाटील, महिला आघाडीच्या सुवर्णा मोहिते, उमेश बाबर, शकील सय्यद हे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)