इस्लामपुरात शिवसेनेचा विकास आघाडीस घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:00 AM2018-06-01T01:00:41+5:302018-06-01T01:00:41+5:30

इस्लामपुरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यातच सांडपाणी साठवण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे.

Shiv Sena's Vikas Aadhar is in the house of Islam | इस्लामपुरात शिवसेनेचा विकास आघाडीस घरचा आहेर

इस्लामपुरात शिवसेनेचा विकास आघाडीस घरचा आहेर

Next
ठळक मुद्देसांडपाणी साठवणीसाठी जागाच नाही : नियोजनापूर्वीच भुयारी गटारीचं ‘चांगभलं’

अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपुरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यातच सांडपाणी साठवण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना त्रास होणार असून हे काम थांबवावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी केली आहे. पवार यांचा विरोध म्हणजे विकास आघाडीसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

इस्लामपूर पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का देण्यात विकास आघाडीची भक्कम मोट यशस्वी ठरली. परंतु सत्ताधारी विकास आघाडीतील नेत्यांमध्ये अद्याप ताळमेळ नाही. महाडिक गट, भाजप, शिवसेना, कॉँग्रेस यांनी एकत्रित येऊन बांधलेल्या विकास आघाडीचा रिमोट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हातात असला तरी, महाडिक आणि शिवसेनेचा सवतासुभा कायम आहे. त्यामुळे विकासकामे करताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना खडतर प्रवासातून मार्ग काढावा लागत आहे.

इस्लामपूर शहरात सध्या कामे सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेची संकल्पना मूळची राष्ट्रवादीची आहे. त्यासाठी ३३ कोटी रुपये उपलब्ध आहेत. ही योजना ७० कोटींची होती. ती आता १०० कोटीच्या घरात पोहोचली आहे. या योजनेला विकास आघाडीने गती दिली आहे. सांडपाणी साठवण्यासाठी शहरात अथवा शहरालगत तीन ठिकाणी जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. या जागा उपलब्ध होण्याअगोदरच भुयारी गटारीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे चुकीचे असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे.

सध्या भुयारी गटारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहर व उपनगरातील १७ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे काही मार्गावर रस्ते उकरले आहेत. या कामामुळे बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईप फुटल्या आहेत. दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. भुयारी गटारीच्या कामासाठी पालिकेकडे सध्या ३३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. हा निधी संपल्यानंतर पुन्हा शासनाकडून उपलब्ध करावा लागणार आहे. तोपर्यंत लोकसभा- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागतील. मुख्य रस्त्यावरील कामे नागरिकांना अडचणीची ठरू शकतात. त्यामुळे शिवसेनेने भुयारी गटारीविरोधात आवाज उठवला आहे. शिवसेनेचा विरोध विकास आघाडीला ‘घरचा आहेर’ म्हणावा लागेल.
 

भुयारी गटार योजनेचे सतरा किलोमीटरचे काम झाले आहे. परिसरातील जुन्या गटारी बुजल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे. सध्या सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे.
- आनंदराव पवार, शिवसेना गटप्रमुख, इस्लामपूर नगरपरिषद

शहरात भुयारी गटार योजनेचे काम गतीने सुरू आहे. यासाठी शंभर कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सध्या काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. शहराच्या विकासासाठी हे काम दर्जेदारच झाले पाहिजे.
- विक्रम पाटील, पक्षप्रतोद

Web Title: Shiv Sena's Vikas Aadhar is in the house of Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.