सांगली, मिरजेत शिवजयंती उत्साहात
By admin | Published: February 19, 2017 11:47 PM2017-02-19T23:47:55+5:302017-02-19T23:47:55+5:30
शिवरायांचा जयघोष : मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम समाजाच्यावतीने मिरवणुका; शिवभक्तीला उधाण
सांगली : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ’, ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’चा गजर आणि लक्षवेधी मिरवणुकांनी रविवारी सांगलीतील वातावरण शिवमय झाले होते. विविध कार्यक्रमांनी शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त सांगली शहरातील हिंदू-मुस्लिम संघटनेची शोभायात्रा लक्षवेधी ठरली. मिरजेतही विविध संघटनांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनच्यावतीने सांगलीत रविवारी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक हणमंत पवार व हाजी रफिक बिडीवाले यांच्याहस्ते पूजन, तर असीफ बावा, नासिर शरीकमसलत यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युसूफ मेस्त्री, जानिब मुश्रीफ, रामभाऊ पाटील, कय्युम पटवेगार, युसूफ जमादार, रवींद्र खराडे, झाकीर पिरजादे, बाबू तांबोळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्लिम मावळे : लक्षवेधी
सांगली शहरातील हिंदू-मुस्लिम संघटनेने आयोजित केलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत घोडे, सजीव देखाव्यांबरोबरच शिवरायांचे मुस्लिम मावळे आणि अंगरक्षकांच्या भूमिका साकारल्या होत्या. रिसाला रोड, स्टेशन चौक, हरभट रोड, मारुती चौक या मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जयश्रीताई पाटील, असीफ बावा, सुनीता मोरे, उत्तम कांबळे, करीम मेस्त्री यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा व घोडदळाच्या सहभागामुळे ही शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अभिवादन रॅली
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शनिवारी रात्री बारा वाजता अभिषेक घालून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी शहरात अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती. पारंपरिक वेशभूषेत दुचाकीवरून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. राम मंदिर, स्टेशन चौक, हरभट रोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, शंभर फुटी या मार्गावरून शिवरायांची प्रतिमा घेऊन मिरवणूक निघाली होती. यावेळी डॉ. संजय पाटील, संजय देसाई, रणजित पाटील, योगेश पाटील, सुधाकर पाटील, बाळ सावंत, विजय भोसले, प्रदीप बर्गे, आशा पाटील, प्रिया गोटखिंडे, कविता गोंधळे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.