शिवाजी पवार पुन्हा हातात घड्याळ बांधण्यासाठी आतूर, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:11 PM2022-02-15T13:11:46+5:302022-02-15T13:12:16+5:30
सध्या त्यांची भूमिका तटस्थ आहे, पण आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : दिवंगत एम. डी. पवार यांचे कुटुंबीय व यशोधन फाउंडेशनचे संस्थापक, माजी नगरसेवक शिवाजी पवार नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हातात घड्याळ बांधण्यासाठी आतूर झाले आहेत, परंतु त्यांचे बंधू आणि विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांच्या प्रेमापोटी त्यांनी निर्णय राखून ठेवला आहे.
मागील निवडणुकीत शिवाजी पवार यांच्या मातोश्री सुशिला पवार यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी दाखल केली होती; परंतु ऐनवेळी पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का बसला. पालिकेत विकास आघाडीची सत्ता आली.
दुसरीकडे शिवाजी पवार यांचे बंधू वैभव पवार सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. सभागृहात त्यांच्या आक्रमकता अनेकदा दिसून आली. दोन्ही पवार बंधू एकत्र आले; परंतु शिवाजी पवार यांनी यशोधन ग्रुपवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या त्यांची भूमिका तटस्थ आहे, पण आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
घड्याळ बांधणार, की आघाडीसोबत जाणार?
काँग्रेसचे नेते परंतु इस्लामपुरातील राजकारणात भाजपशी सलगी असलेले वैभव आणि विजय पवार हे दोघे बंधू राष्ट्रवादीला विरोध करण्यात आघाडीवर असतात. आता शिवाजी पवार निवडणुकीत वैभव आणि विजय पवार यांच्या बरोबरीने विकास आघाडीतून लढणार की, पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार हे स्पष्ट झालेले नाही.
मी भाजपमध्ये अस्वस्थ आहे. बंधुप्रेमापोटी घड्याळ बांधावे वाटत नाही! पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत एक बैठकही झाली; परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणूक लढविणार आहे. - शिवाजी पवार, माजी नगरसेवक