शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सव : सांगलीत बहरला तरूणाईचा कलाअविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:14 AM2018-11-01T10:14:29+5:302018-11-01T10:17:25+5:30
सूरमयी सफर घडविणारे सुगम गायन, ठेका धरायला लावणारे लोकवाद्यवृंद, कला-संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोककला, देशभक्ती जागविणाऱ्या समूहगीत अशा विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून बुधवारी तरूणाईचा कलाअविष्कार बहरला. उत्साही आणि जल्लोषी वातावरणात शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्रारंभ झाला.
संतोष मिठारी/ शरद जाधव
सांगली : सूरमयी सफर घडविणारे सुगम गायन, ठेका धरायला लावणारे लोकवाद्यवृंद, कला-संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोककला, देशभक्ती जागविणाऱ्या समूहगीत अशा विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून बुधवारी तरूणाईचा कलाअविष्कार बहरला. उत्साही आणि जल्लोषी वातावरणात शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्रारंभ झाला.
सांगलीच्या उच्च शिक्षणक्षेत्रात शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या विलिंग्डन महाविद्यालयाला मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. महाविद्यालयातील खुला रंगमचावर सकाळी अकरा वाजता महोत्सावाचे उदघाटन झाले. त्यानंतर तासभरात महोत्सवातील विविध स्पर्धांना सुरूवात झाली.
खुला रंगमंचावरील सुगम गायनामध्ये भावगीत, भक्तीगीत, मराठी-हिंदीतील भजन आणि गझलांनी सूरमयी सफर घडविली. वेलणकर हॉलमधील एकांकिकामधून आई-मुलीचे नातेसंबंध, लहानमुलांचे भावविश्व उलगडले.
महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरील पटांगणातील पथनाट्यातून महागाई, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, वाढत्या आत्महत्या आदी सामाजिक प्रश्नांचा तरूणाईने वेध घेतला. दुपारी साडेतीननंतर महोत्सवातील गती वाढली. खुल्या रंगमंचावरील समूहगीतांतून देशभक्ती जागविली, तर लोकगीतांनी डोलविले. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, निसर्ग संवर्धन याविषयांवर वक्तृत्व स्पर्धेतून तरूणाईने आसूड ओढला.
सोशल मिडियाच्या फायदा-तोटा यावर ह्यवादविवादह्ण रंगला. पटांगणातील विविध ठिकाणी सांघिक रचनाकृतीतून युवा महोत्सव, स्वच्छता अभियान आणि सेल्फी विषयांवरील विविध कलाकृती साकारल्या. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून साकारलेल्या या कलाकृती लक्षवेधक ठरल्या. लघुनाट्य आणि मूकनाट्यातून विविध सामाजिक प्रश्न तरूणाईने मांडले.
सायंकाळी पाचनंतर तरूणाईचे पाऊले कांतीलाल शाळेच्या परिसराकडे वळली. तासभरातच हा परिसर गर्दीने फुलला. त्याठिकाणी झांज-खैताळ, धनगरी ढोलचा दणदणाट, संबळ, तुणतुणे, लेझीम, तुतारीचा निनाद आणि बासरी, घुमकं, ताशाचा खणखणाट, तर सूरपेटीच्या मधुर सूरांनी लोकवाद्यवृंद स्पर्धा रंगली. विविधांगी लोककलेच्या माध्यमातून कला-संस्कृतीचे दर्शन घडले. वन्समोअरची फर्माईश आणि टाळ्या, शिटट्यांची दाद अशा उत्साही वातावरणात लोककला स्पर्धा रंगली.
यावर्षीपासून पाच विभागांत सर्वसाधारण विजेतेपद
विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्त यावर्षीपासून मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये पाच विभागांत सर्वसाधारण विजेतेपद दिले जाणार आहे. त्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, वाड्:मय, कला विभागांचा समावेश आहे. त्यासाठीचे चषक विलिंग्डन महाविद्यालयातर्फे देण्यात येणार आहे. हे चषक फिरते राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर आणि विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी सांगितले.
सेल्फी अन् धमाल
या महोत्सवात स्पर्धेक, समर्थक, प्रेक्षकांच्या भूमिकेतून सहभागी झालेल्या तरूणाईची दिवसभर धमाल सुरू होती. पथनाट्य, समूहगीत, लोककला, लोकवाद्यवृंद आदी कलाप्रकारांतील सादरीकरणानंतर त्यातील सहभागी कलाकार आणि समर्थक विद्यार्थी आवर्जून ह्यसेल्फीह्ण घेऊन आनंद व्यक्त करीत होते.