शिवाजीराव देशमुख यांचे निधन सांगली जिल्ह्यावर शोककळा : पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:22 AM2019-01-15T00:22:47+5:302019-01-15T00:24:00+5:30

पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार शिवाजीराव बापूसाहेब देशमुख (वय ८४) यांचे सोमवारी सायंकाळी मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले.

 Shivajirao Deshmukh dies due to grievous Sadli district: Partitioned, principled politician harasses | शिवाजीराव देशमुख यांचे निधन सांगली जिल्ह्यावर शोककळा : पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी हरपला

शिवाजीराव देशमुख यांचे निधन सांगली जिल्ह्यावर शोककळा : पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी हरपला

Next
ठळक मुद्दे शिवाजीराव देशमुख यांचे निधन सांगली जिल्ह्यावर शोककळा : पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी हरपला

शिराळा/कोकरुड : पक्षनिष्ठ, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार शिवाजीराव बापूसाहेब देशमुख (वय ८४) यांचे सोमवारी सायंकाळी मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात सायंकाळी सव्वासहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज, मंगळवारी सायंकाळी ४ वाजता कोकरुड (ता. शिराळा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तेरा वर्षांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा विकार झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता त्यांचे निधन झाले. देशमुख यांच्या पश्चात पत्नी सरोजनी, पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, मुलगी डॉ. शिल्पा, भाऊ फत्तेसिंगराव, सून रेणुका, जावई डॉ. मनोज असा परिवार आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य असलेल्या शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी तिळवणी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकरूड येथे झाले. माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिराळा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून नऊ वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते १९६७ मध्ये बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचायत समितीवर बिनविरोध निवडून आले. १९६७ ते १९७२ यादरम्यान त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम केले.

यादरम्यान विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९७२ ते १९७४ यादरम्यान ते सांगली जिल्हा परिषदेमध्ये कृषी सभापती होते. याच कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यालयात कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती. १९७८ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पहिली विधानसभा निवडणूक लढविली. यानंतर सलग चारवेळा त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.

१९८३ ते १९८५ मध्ये सामान्य प्रशासन, गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. १९८५ ला कृषी, ऊर्जा व परिवहन राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १९८५-८६ मध्ये पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८८-९० यादरम्यान पुनर्वसन व ग्रामविकास मंत्री, तर १९९१-९२ मध्ये सहकार, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण व परिवहन मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ९३-९४ ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९९२-९६ या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. १९९६ मध्ये त्यांची विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. २००२ पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली. २००१ मध्ये विधानपरिषदेत उत्कृष्ट भाषणाबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळ व महाराष्ट्र शाखेकडून त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. २००४ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली. २००५ मध्ये युनायटेड किंगडम संसदेच्या ५२ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अबूजा (नायजेरिया) येथे आयोजित बैठकीस संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता.

२००७ मध्ये इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे झालेल्या तिसऱ्या आशिया-भारत परिषदेला राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची उपस्थिती होती. २००८ मध्ये तिसºयांदा त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. सलग तीनवेळा त्यांची विधानपरिषदेवर सभापतीपदी निवड झाली. २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते उल्लेखनीय संसदीय कारकीर्दीसाठी त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला होता. आजअखेर ते विधानपरिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.
 

कोकरूडमध्ये आज अंत्यसंस्कार
देशमुख यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता मुंबईहून विमानाने कºहाड येथील विमानतळावर सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. त्यानंतर कºहाड विमानतळावरून पार्थिव शिराळा येथे आणण्यात येईल. शिराळा काँग्रेस कमिटीत सकाळी ११.१५ ते १२.१५ या वेळेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव कोकरूड येथील ‘हीरा निवास’ या त्यांच्या निवासस्थानी येईल. तेथे दुपारी १ ते २ या वेळेत ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता गावातून अंत्ययात्रा निघणार आहे. दुपारी ४ वाजता कोकरूड फाट्यावरील पेट्रोल पंपासमोरील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर : सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाची बातमी कोकरुडमध्ये समजली. त्यातच देशमुख यांच्या नावे रविवार, दि. १३ जानेवारीपासून कोकरूडमध्ये व्याख्यानमाला सुरू होती. सोमवारी ही व्याख्यानमाला सुरू होताच उर्वरित कार्यक्रम होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. देशमुख यांचे निधन झाल्याचे वृत्त तालुक्यात वाºयासारखे पसरले. यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कोकरुडकडे धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Web Title:  Shivajirao Deshmukh dies due to grievous Sadli district: Partitioned, principled politician harasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.