शिवप्रेमींच्या जल्लोषाने सांगली शिवमय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:57 PM2019-02-19T22:57:14+5:302019-02-19T22:57:20+5:30
सांगली : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ’, ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’चा गजर आणि लक्षवेधी मिरवणुकांनी मंगळवारी सांगलीतील वातावरण शिवमय ...
सांगली : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ’, ‘जय भवानी, जय शिवाजीऽऽ’चा गजर आणि लक्षवेधी मिरवणुकांनी मंगळवारी सांगलीतील वातावरण शिवमय बनले होते. विविध कार्यक्रमांनी शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी होती.
मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ व शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने रात्री बारा वाजता मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जन्मोत्सव साजरा केला. यावेळी शिवपे्रमींच्यावतीने आतषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी दिवसभर समितीच्यावतीने विविध संघटना, मंडळांच्या रॅलींचे स्वागतही करण्यात आले.
मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी होती. आ. सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरात दिवसभर शोभायात्रा, मोटारसायकल रॅली व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग येथील छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच तरुण शिवाजी मंडळाने शिवभोजनाचे आयोजन केले होते. युवा शक्तीतर्फे वाल्मिकी आवासमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते.
मराठा समाज संस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष तानाजीराव मोरे यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. यावेळी अध्यक्ष उत्तमराव निकम, बाबासाहेब भोसले, प्रा. शशिकांत जाधव, रघुनाथ पाटील, अशोक सावंत उपस्थित होते.
वसंतदादा साखर कारखानास्थळी शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुनील आवटी, संजय पाटील, प्रकाश पाटील, हेमंत कुरणे, हेमंत पाटील, प्रदीप शिंदे उपस्थित होते.
स्टेशन चौकात ‘छत्रपती शासन’ मंडळाच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. माजी आमदार दिनकर पाटील, स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी येथे शिवप्रतिमेस अभिवादन केले. या मंडळाच्यावतीने सायंकाळी शिवप्रतिमेची भव्य अशी लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली.
पुरोगामी बहुजन फौंडेशनच्यावतीने प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन झाले. यावेळी कय्युम शेख, जाकिर पन्हाळकर, इरफान तहसीलदार, गणेश पवार, शिवाजी त्रिमुखे उपस्थित होते.
‘मुस्लिम समाज’तर्फे : साहित्य वाटप
सांगली शहरातील समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे येथील स्टेशन चौकात शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. समितीतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली जाते. पण यंदा पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून, मिरवणूक रद्द केली. मिरवणुकीच्या खर्चाची २५ हजाराची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देण्यात आली. सायंकाळी ३०० गरीब कुटुंबियांना जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्याहस्ते धान्य, साड्या, ब्लँकेटचे वाटप झाले. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपअधीक्षक अशोक वीरकर उपस्थित होते. याचे संयोजन आसिफ बावा, नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, युसूफ मेस्त्री, उमर गवंडी, युनूस महात, मोहसीन मुल्ला, मुन्ना पट्टेकरी, शहानवाज फकीर यांनी केले.
शहरात रॉयल्स, रुद्राक्ष फौंडेशनची रॅली
रॉयल्स युथ फौंडेशनतर्फे ‘मावळा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सर्वधर्मसमभावाचा संदेश देत विविध सामाजिक घटकांतील तरुण रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील, रोहित पाटील, ऋषभ पाटील, यश माने, श्रेयस मोकाशी, शुभम देवके, रोहित भजनाईक, सोहेल शेख, सोहेल तांबोळी यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कारखाना परिसरातील रुद्राक्ष फौंडेशनने भव्य मिरवणूक काढली. चांदीचा रथ, शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व शिवप्रेमींच्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. मारुती चौकात या रॅलीची सांगता झाली. शिवसेनेचे नेते शेखर माने, फौंडेशनचे गणेश चौधरी, नीलेश भोसले, सुनील यमगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.