कन्याकुमारीहून आणलेल्या शिवज्योतीचे चिंचणीत दिमाखात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:51 PM2022-05-03T13:51:58+5:302022-05-03T13:52:27+5:30
कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवप्रेमी तरुणांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून कन्याकुमारी ते शिवस्मारक चिंचणी आशा १३४२ किमी अंतराच्या शिवज्योत ...
कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवप्रेमी तरुणांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून कन्याकुमारी ते शिवस्मारक चिंचणी आशा १३४२ किमी अंतराच्या शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
ही शिवज्योत मोहीम ४५ जिगरबाज तरुणांनी फत्ते केली असून सोमवारी तिथीनुसार शिवजयंतीदिनी शिवस्मारक चिंचणी येथे शिवज्योत दाखल झाली. चिंचणी व सोनहीरा खोऱ्यातील तरूणांनी व ग्रामस्थांनी सागरेश्वर ते चिंचणी दुचाकी रॅली काढून शिवज्योतीचे स्वागत केले.
स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी (तामिळनाडू) येथून २५ एप्रिल रोजी युवा नेते दिग्विजय कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून निघाली. शिवरायांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा असलेली शिवज्योत घेऊन तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, गोवा राज्यातून धावणाऱ्या तरुणांना गलाई असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे, युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्यासह तेथील गलाई बांधवांनी सर्वोतोपरी मदत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. दरम्यान राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही या शिवप्रेमी तरुणांची विचारपूस करून शुभेच्छा दिल्या.
कन्याकुमारीहुन निघालेली शिवज्योत रविवारी १ मे रोजी सायंकाळी सागरेश्वर येथे पोहोचली. सोमवारी सकाळी चिंचणीसह सोनहीरा खोऱ्यातील हजारो तरुण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुचाकी रॅलीने शिवज्योत शिवस्मारक चिंचणीकडे रवाना झाली. दरम्यान देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद,व चिंचणी येथील ग्रामस्थांनी शिवज्योतीचे स्वागत केले. काल, सोमवारी ही शिवज्योत शिवस्मारक चिंचणी येथे दिमाखात आणली.