सांगलीत अखंड तेवणारी शिवज्योत प्रज्ज्वलित, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:54 PM2022-06-07T13:54:47+5:302022-06-07T13:55:37+5:30
शिवपुतळ्यासमोरील शिवज्योत १२ महिने २४ तास तेवत राहणार आहे. त्यासाठी पुतळ्यासमोर विशेष बांधकाम
सांगली : सांगलीत सोमवारी नेत्रदीपक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड शिवज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून पृथ्वीराज पाटील फाैंडेशनतर्फे चिरंतन ज्योतीची शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर प्रतिष्ठापना करण्यात आली. ती अखंड तेवत राहणार आहे.
सोमवारी रायगडावर ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. सायंकाळी सांगलीत टिळक चौकात जल्लोषी स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, झांजपथक, घोडेस्वार यांसह मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते. फुलांच्या पायघड्यांवरून ज्योतीची मिरवणूक निघाली. मारुती रस्त्यावरून पुतळ्याजवळ आली. यावेळी अखंडपणे आतषबाजी सुरू होती. शिवरायांचा जयघोष सुरू होता.
शिवज्योत प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवपुतळ्याला नेत्रदीपक रोषणाई केली होती. प्रकाशझोतामुळे पुतळा उजळून निघाला होता. छत्रपतींच्या जय-जयकारात शिवज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली होती. वीरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून शिवज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संयोजन पृथ्वीराज पाटील व सहकाऱ्यांनी केले.
१२ महिने २४ तास शिवज्योत तेवणार
शिवपुतळ्यासमोरील शिवज्योत १२ महिने २४ तास तेवत राहणार आहे. त्यासाठी पुतळ्यासमोर विशेष बांधकाम केले आहे. ज्योतीसाठी गॅसचा वापर केला असून आठवड्याला सुमारे दोन सिलिंडर लागतील. अखंड शिवज्योतीची ही संकल्पना एकमेव असल्याचा दावा पृथ्वीराज पाटील यांनी केला. शिवज्योतीद्वारे तरुणांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.