Crime News: तासगावात दोन गटांतील वादातून शिवनेरी मंडळाच्या अध्यक्षाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:30 AM2022-08-05T11:30:30+5:302022-08-05T11:31:13+5:30
दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली
तासगाव : तासगाव शहरात ढवळवेस येथे जुन्या भांडणाच्या वादातून शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल बाबासाहेब जाधव (वय ५०) यांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
तासगाव शहरात ढवळवेस येथे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली होती. याच वादातून गुरुवारी दुपारी पुन्हा या दोन गटांतील कार्यकर्त्यांत वादावादी झाली होती. दुपारच्या सुमारास कोकणे कॉर्नरजवळ दोन गटांतील तरुणांत किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानंतर पुन्हा या दोन गटांतील वाद उफाळला होता.
सायंकाळपर्यंत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ल्याची तयारी होती. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस पडू लागल्यानंतर गर्दी पागंली. अनिल जाधव यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच सुमारे पन्नासहून अधिक तरुणांच्या जमावाने ढवळवेसमध्ये प्रवेश करून हल्ला केला. हल्लेखोरांनी अनिल जाधव यांच्यावर घरापासून काही अंतरावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर लगेचच पसार झाले. हल्ल्यानंतर जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
खूनाच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दखाखान्याबाहेरदेखील जाधव यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.