शिवराम भोजे यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 07:53 PM2020-01-08T19:53:18+5:302020-01-08T19:55:03+5:30
भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. भोजे यांंनी भाभा अणुसंशोधन केंद्र प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून रूजू झाले. एक मेगावॅटच्या वेगवान-ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाईन टीमचे सदस्य म्हणून फ्रान्समधील उशपींशी याठिकाणी ते एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर होते.
सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील फोरमच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी दिली.
ते म्हणाले की, अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फोरमतर्फे दरवर्षी समाजपरिवर्तनाचे कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर झाला आहे. डॉ. शिवराम भोजे प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ असून, त्यांनी डिझाईन, बांधकाम, आॅपरेशन, संशोधन आणि विकास या क्षेत्रात चाळीस वर्षे वेगवान-ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य केले आहे. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. भोजे यांंनी भाभा अणुसंशोधन केंद्र प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून रूजू झाले. एक मेगावॅटच्या वेगवान-ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाईन टीमचे सदस्य म्हणून फ्रान्समधील उशपींशी याठिकाणी ते एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर होते. त्यानंतर इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅॅटोमिक रिसर्चचे संचालक, एफबीटीआरचे अणुभट्टी अधीक्षक, तसेच अणुुऊर्जा विभागाच्या अनेक समित्यांचे सभासद व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. भारतीय नाभीकिय विद्युत निगम लिमिटेडचे ते संस्थापक-संचालक होते. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापूर येथे स्थायिक असून, शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी फोरमचे विश्वस्त व संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक तानाजीराव मोरे, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे आदी उपस्थित होते.