शिवसेनेच्या गाडीला चिकुर्डेकरांचं वंगण!
By admin | Published: June 22, 2016 11:30 PM2016-06-22T23:30:08+5:302016-06-23T01:45:13+5:30
वाळवा-शिराळा : निवडणुकीत राष्ट्रवादीचा अडसर
अशोक पाटील-- इस्लामपूर --राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. या दोघांनाही शिवेसेनेची साथ आहे. इस्लामपूर मतदारसंघात जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शिवसेनेला ताकद दिली आहे, तर शिराळा मतदारसंघातील शिवसेनेची बैलगाडी वंगणाअभावी चालेनाशी झाली आहे. आता या गाडीला अभिजित पाटील यांच्या रूपाने वंगण मिळाले आहे, तरीसुध्दा जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचा अडसर दोन्ही मतदारसंघात राहणार आहे.शिराळ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र झाल्यास ताकद नेहमीच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापली ताकद अजमावली. यामध्ये शिवाजीराव नाईक सरस ठरले. तसेच त्यांना मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु शिवसेनेची ताकद कोठेही दिसली नाही. याच मतदारसंघातील चिकुर्डेचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या पाठीशी स्वाभिमानी संघटना, भाजप व शिवसेनेची ताकद होती. परंतु राष्ट्रवादीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. इस्लामपूर मतदारसंघात जिल्हाप्रमुख पवार यांची ताकद आहे. पालिकेच्या सभागृहात ते स्वत: निवडून आले आहेत. त्यातच अभिजित पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सध्या इस्लामपुरात आणि परिसरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. नुकताच शिवसेनेचा ५० वा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाच्या विद्युत पुरवठ्याबाबतचा प्रश्न पाटील यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. एकंदरीत शिराळा मतदारसंघातील परंतु वाळवा तालुक्यात असलेल्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाटील यांच्यामुळे वाळवा— शिराळ्यातील शिवसेनेच्या संथ गतीने चाललेल्या बैलगाडीला आता वेग आला आहे.
जि. प. निवडणूक : सक्षम उमेदवार देणार
अभिजित पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चिकुर्डेसारख्या मतदारसंघात अभिजित पाटील यांचे वजन आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे.आगामी पालिका आणि जि. प. निवडणुकीत चांगले उमेदवार देणार आहोत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पावर यांनी दिली.