सांगली महापालिकेत शिवसेनाच सक्षम पर्याय : नितीन बानुगडे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:13 PM2017-10-19T15:13:01+5:302017-10-19T15:19:58+5:30
सांगली महापालिकेच्या सत्तेचा उपभोग घेतलेले कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आणि त्यांचे नगरसेवक बदनाम झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुुंबई आणि ठाण्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेली शिवसेनाच लोकांसमोर चांगला पर्याय ठरेल, असे मत संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सांगली , दि. १९ : महापालिकेच्या सत्तेचा उपभोग घेतलेले कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आणि त्यांचे नगरसेवक बदनाम झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुुंबई आणि ठाण्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेली शिवसेनाच लोकांसमोर चांगला पर्याय ठरेल, असे मत संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सांगलीत त्यांच्याहस्ते नगरसेवक शेखर माने यांचा पक्षप्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार आहे. माजी आमदार संभाजी पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, पृथ्वीराज पवार, नुकतेच प्रवेश केलेले नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका निवडणूक लढवली जाईल.
सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. पाणी योजना, ड्रेनेज यासह आरोग्याचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एकही रस्ता धड नाही, खड्ड्यांचे साम्राज्य आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे होऊनही मूलभूत सुविधा पुरवू शकत नाही.
साडेसहाशे कोटींचे बजेट मांडणाऱ्या भ्रष्ट महापालिकेला विकासकामांसाठी खर्चाला पैसे नाहीत, ही गोष्टच न पटणारी आहे. दूषित पाणी, रस्ते, कचरा उठाव याबाबत कारभारी उदासीन आहेत. घरकुल योजनेतील घरकुले निकृष्ट आहेत. कराचा पैसा देऊनही त्याचा मोबदला मिळत नसेल, तर नागरिकांना निश्चितच वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. सर्व पक्ष अपयशी ठरलेत. आता शिवसेना महापालिका निवडणुकीत सक्षम पर्याय देणार आहे.
शिवसेनेत गटबाजीला थारा नाही
शिवसेनेत गटबाजीला थारा नाही. पक्षाचा आदेश आला की तो मानावाच लागतो. काही मतभेद असले तरी वरिष्ठांकडे मांडून दूर करता येतात. माजी आमदार संभाजी पवार, पृथ्वीराज पवार हे शिवसेनेतच आहेत. यापुढे एकदिलाने शिवसेना प्रत्येक तालुक्यात पक्षाची बांधणी करणार आहे, असे बानुगडे म्हणाले.
सेना व माझे विचार सारखेच
शेखर माने म्हणाले की, सत्तेत असूनही भ्रष्ट कारभाराविरोधात लढण्याची भूमिका आम्ही महापालिकेत स्वीकारली. त्यासाठी आक्रमकताही अंगिकारली. तशीच भूमिका घेऊन शिवसेनाही राज्याच्या सत्तेत असूनही लढत आहे. भूमिकांमधील साम्य असलेला हाच धागा मला या पक्षाकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरला. पद किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता प्रवेश केला आहे. शिवसेनेनेही मला पूर्वीप्रमाणेच काम करण्याची मोकळीक दिली आहे.