काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना शिवसेनेचा पाठिंबा, भाजपाला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 05:08 PM2018-05-10T17:08:55+5:302018-05-10T17:22:54+5:30
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार
सांगली : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार आहे. काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे मैदानात उतरले आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना आपला पांठिबा जाहीर केला होता. त्यानंतर आज शिवेसनेनेही विश्वजीत कदम यांना पाठिंबा जाहीर करून भाजपाला झटका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत.
सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.