राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:25+5:302021-06-05T04:20:25+5:30
बुधगाव : राज्यात दर वर्षी दि. ६ जून हा ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणून आत्तापर्यंत साजरा केला जातो. आता ६ ...
बुधगाव : राज्यात दर वर्षी दि. ६ जून हा ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणून आत्तापर्यंत साजरा केला जातो. आता ६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. तसे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या कर्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर पहिल्यांदाच ‘भगवा’ फडकणार आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे कारभारी तयारीला लागले आहेत.
‘शिवस्वराज्य दिन’ कसा साजरा करावा याबाबतची यथासांग नियमावलीही या परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे. भगवा स्वराज्यध्वज हा उच्च प्रतीच्या सॅटीनची जरी-पताका असावी, ध्वज तीन फूट रुंद व सहा फूट लांब असावा. जिरेटोप, सुवर्ण होन, जगदंब तलवार, शिवमुद्रा व वाघनखे या महाराजांच्या पाच शुभचिन्हांनी तो अलंकृत असावा. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहितेमध्ये १५ फूट उंचीचा वासा किंवा बांबू असावा असे म्हटले आहे. त्यावर सुवर्ण लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला पाच ते सहा फुटांचा आधार द्यावा, असे सांगण्यात आले आहे. आवश्यक साहित्यामध्ये सुवर्णकलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षदा, हळद, कुंकू व ध्वनिक्षेपक असे साहित्य आहे. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सकाळी ९ वाजता उभी करायची असून, ती तयार करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. गुढी उभारल्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणायचे आहे. सूर्यास्तावेळी राजदंड शिवस्वराज्य गुढी खाली घ्यायची आहे.